कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनी कच्चा माल आणि मालवाहतुकीच्या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकल्यानंतर एसी (AC) आणि रेफ्रिजरेटर्सच्या किमती नवीन वर्षात वाढल्या आहेत. याशिवाय या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चपर्यंत वॉशिंग मशीनच्या किमती पाच ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
पॅनासॉनिक, एलजी, हायर यासह अनेक कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या आहेत, तर सोनी, हिताची, गोदरेज अप्लायन्सेस या तिमाहीच्या अखेरीस दरवाढीचा निर्णय घेऊ शकतात. दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG ने गृहोपयोगी वस्तूंच्या श्रेणीतील वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. "कच्चा माल आणि लॉजिस्टिकच्या किमतीत झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. आम्ही नाविन्यपूर्ण उपाययोजनांद्वारे खर्च स्वतःहून भरून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, परंतु व्यवसाय टिकवण्यासाठी किंमती वाढणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या गोम अप्लायन्सेस अँड एसी बिझनेसचे उपाध्यक्ष दीपक बन्सल यांनी दिली.
हिताची एसी इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरमीत सिंग यांनी किंमतीमध्ये वाढ हे अपरिहार्य असल्याचं म्हटलं. कच्चा माल, कर आणि वाहतूक यासह उत्पादनाचा खर्च वाढला आहे. अशातच ब्रँड एप्रिल महिन्यापर्यंत किंमतींमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ करेल. तसंच टप्प्याटप्प्यानं ८ ते १० टक्क्यांची वाढ केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
अधिक खर्चांमुळे कंपन्या चिंतेत
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SIEMA) नुसार, कंपन्या जानेवारी ते मार्च या कालावधीत किंमती ५-७ टक्क्यांनी वाढवेल. “कमोडिटीच्या किमती, जागतिक मालवाहतूक शुल्क आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेऊन आम्ही आमच्या रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एसीच्या किंमतीत तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत," अशी प्रतिक्रिया हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस यांनी दिली.