Lokmat Money > बिझनेस न्यूज > George Soros: भारतीय उद्योजकांवर आरोप अन् मोदींचा राग...जॉर्ज सोरोसची 'कुंडली' काय?

George Soros: भारतीय उद्योजकांवर आरोप अन् मोदींचा राग...जॉर्ज सोरोसची 'कुंडली' काय?

अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आता गौतम अदानी, अनिल अग्रवाल यांच्या कंपन्यांवर आरोप केलेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 02:21 PM2023-09-01T14:21:29+5:302023-09-01T14:27:31+5:30

अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आता गौतम अदानी, अनिल अग्रवाल यांच्या कंपन्यांवर आरोप केलेत.

Accusations on Indian entrepreneurs targeting pm narendra modi know who is critic George Soros | George Soros: भारतीय उद्योजकांवर आरोप अन् मोदींचा राग...जॉर्ज सोरोसची 'कुंडली' काय?

George Soros: भारतीय उद्योजकांवर आरोप अन् मोदींचा राग...जॉर्ज सोरोसची 'कुंडली' काय?

अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. OCCRP या नॉन प्रॉफिट मीडिया संस्थेत त्यांची गुंतवणूक असून, भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आणि अनिल अग्रवाल यांना त्यांनी लक्ष्य केलं आहे. अदानी समूहानं गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा त्याच्या एका अहवालात करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या एका अहवालात, OCCRP नं वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यावर देशाचे पर्यावरणविषयक कायदे कमकुवत करण्यासाठी गुप्तपणे लॉबिंग केल्याचा आरोप केला आहे. ९२ वर्षीय सोरोस यांना जगातील अनेक देशांच्या राजकारण आणि समाजावर प्रभाव टाकण्यासाठी स्वत:चा अजेंडा चालवणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कट्टर टीकाकार मानले जातात.

वादग्रस्त प्रतिमा
जॉर्ज सोरोस हे अमेरिकेतील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. मात्र त्यांची प्रतिमा चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. ते एक सट्टेबाज, गुंतवणूकदार आणि व्यापारी आहेत. पण स्वत:ला ते तत्त्वज्ञानी आणि समाजसेवक म्हणवून घेणं पसंत करतात. जगातील अनेक देशांच्या राजकारण आणि समाजावर प्रभाव टाकण्याचा अजेंडा चालवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अनेक देशांतील निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी उघडपणे प्रचंड निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोपही आहे. युरोप आणि अरब देशांमध्ये सोरोस यांच्या संस्थांवर जबर दंड आकारून बंदी घालण्यात आली आहे. सोरोस हे व्यवसाय आणि समाजसेवेच्या नावाखाली पैशाच्या जोरावर जगातील अनेक देशांच्या राजकारणात हस्तक्षेप करतात, असाही आरोप आहे.

मोदींचे कट्टर टीकाकार
सोरोस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कट्टर टीकाकार मानले जातात. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हुकूमशाही व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यास आणि सीएए यांनाही सोरोस यांनी उघडपणे विरोध केला होता. हिंडनबर्ग रिसर्चनं जानेवारीमध्ये अदानी समूहाच्या विरोधातील अहवाल प्रसिद्ध केला. तेव्हाही त्यांनी जोरदार टीका केली होती. "अदानी यांचे पंतप्रधान मोदींशी इतके जवळचं नातं आहे की दोघेही एकमेकांसाठी आवश्यक झाले आहेत. मोदी या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत, पण त्यांना परदेशी गुंतवणूकदार आणि संसदेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यामुळे केंद्र सरकारवरील मोदींची पकड सैल होईल आणि संस्थात्मक सुधारणांचे दरवाजे उघडतील," असं ते म्हणाले होते.

शेअर बाजारात गुंतवणूक आणि कोट्यधीश
सोरोस यांचा जन्म १९३० मध्ये हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे एका ज्यू कुटुंबात झाला. १९४७ मध्ये ते आपल्या कुटुंबासह लंडनला आले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी पोर्टर आणि वेटर म्हणून काम केले. त्यातून पैसे वाचवून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं. १९५६ मध्ये ते लंडनहून अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांनी वित्त आणि गुंतवणूक क्षेत्रात काम केलं. १९७३ मध्ये त्यांनी सोरोस फंड मॅनेजमेंट या नावानं एक कंपनी स्थापन केली. यानंतर त्यांनी अमेरिकन शेअर बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि पुढच्या ६ वर्षात ते कोट्यधीशही झाले.

सोरोस यांच्यावर गंभीर आरोप
जॉर्ज सोरोस यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. स्वत:चा खिसा भरण्यासाठी १९९२ मध्ये बँक ऑफ इंग्लंड उद्ध्वस्त केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यानंतर ब्रिटनला ब्लॅक वेन्सडेचा सामना करावा लागला, ज्यामध्ये सोरोस यांनी अब्जो डॉलर्स कमावले. त्याच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या मदतीनं ते सुमारे १०० देशांमध्ये सक्रिय आहेत. जॉर्ज बुश यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी १२५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर फॉक्स न्यूज ही मीडिया कंपनी उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी दहा लाख डॉलर्स खर्च केले होते. तसेच ब्रेक्झिटच्या विरोधात प्रचारात चार लाख पौंड खर्च करण्यात आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्यांनी ठग म्हटलं होतं.

मोदी, पुतीन, जिनपिंग यांच्यावर निशाणा
२०२० मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WEF) सोरोस यांनी मोदी, ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हुकूमशहा असं संबोधलं. सर्व नेते आपापल्या देशात लोकशाहीचा गळा घोटून हुकूमशाहीला चालना देत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मोदींबाबत ते म्हणाले की, "त्यांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे," असं म्हटलं होतं. तर त्यांना ट्रम्प यांचा उल्लेख फसवणूक करणारे आणि नार्सिसिस्ट असा केला. तर पुतिन यांना हुकूमशाही शासक म्हटलं. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची परंपरा मोडून जिनपिंग यांनी सत्तेची पूर्ण कमान स्वत:च्या हातात घेतली आहे, असंही सोरोस म्हणाले होते.

सोरोस यांच्यावर अनधिकृत मार्गाने पैसा कमावल्याचा आरोप आहे. २००२ मध्ये, एका फ्रेन्च न्यायालयानं सोरोस यांना अनधिकृत व्यापारासाठी दोषी ठरवले. यासाठी फ्रेन्च कोर्टानं सोरोस यांना २.३ मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. या निर्णयाला आव्हान देताना फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयानंही सोरोस यांचा दंड कायम ठेवला. त्याचप्रमाणे अमेरिकेत बेसबॉलमध्ये गुंतवणूक करून अनधिकृत मार्गानं पैसे कमावल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. सोरोस हे इटालियन फुटबॉल संघ एएस रोमाच्या बाबतीतही वादात सापडले होते. सोरोस यांनी आपल्याच आईला आत्महत्या करण्यास मदत केली. १९९४ मध्ये त्यांनीच याचा खुलासा केला होता.

Web Title: Accusations on Indian entrepreneurs targeting pm narendra modi know who is critic George Soros

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.