नवी दिल्ली : सरकारने आयातीवरील करात वाढ केल्याने सोन्याच्या तस्करीत वाढ झाली. त्यामुळे देशातील सोने शुद्धिकरण उद्योग ठप्प झाला आहे, तसेच सरकारचा १ अब्ज डॉलरचा महसूलही बुडाला आहे. भारत हा चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याची मागणी असलेला देश आहे. सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्यामुळे देशाचे विदेशी चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होत होते. त्यावर उपाय म्हणून ३ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवरील कर वाढवून १0 टक्के केला होता. यंदा मार्चमध्ये त्यावर आणखी १ टक्का स्थानिक विक्रीकर लावण्यात आला. असोसिएशन आॅफ गोल्ड रिफायनरीज अँड मिंटचे सचिव जेम्स जोस यांनी सांगितले की, शुद्धिकरण कारखान्यांना अवघा १ टक्का मार्जिन असते. तस्कर थेट शुद्ध सोने भारतात आणतात, तसेच ४ ते ५ टक्के सूट देतात. व्यवसाय बंद करण्याशिवाय दुसरा उपायच आमच्यासमोर नाही. देशातील सर्व ३२ शुद्धिकरण प्रकल्पांनी खाणींकडून येणारे कच्चे सोने घेणे थांबविले आहे. आता केवळ मोडीच्या सोन्यावरच ते काम करीत आहेत. देशात सर्वांत मोठा शुद्धिकरण प्रकल्प असलेल्या ‘एमएमटीसी-पीएएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खोसला यांनी सांगितले, ‘गेल्या वर्षी आम्ही १२0 टन सोने शुद्ध केले होते. यंदा केवळ २0 टन मोड आम्ही शुद्ध करू शकलो.’ सर्वाधिक सोने आयात करणारी बँक ‘अॅक्सिस बँके’चे वरिष्ठ उपाध्यक्ष अरिंदम सरकार यांनी सांगितले की, व्यावसायिक ग्रे मार्केटकडे वळल्यामुळे आमचा व्यवसाय ७५ टक्क्यांनी घटला आहे. सोन्याचा प्रति औंस भाव १,३४0 डॉलर आहे. तस्कर १00 डॉलरने स्वस्त सोने देतात. अलीकडच्या काळात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे बाहेरून सोने आणून विकणे फायदेशीर ठरत आहे. २0१६ मध्ये ३00 टन सोन्याची तस्करी होऊ शकते, असे आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे संचालक बछराज बामलवा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>सोन्याचा दर ५0 रुपयांनी वाढलायेथील सराफा बाजारात सोने ५0 रुपयांनी वाढून ३१,२५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी मात्र ३२५ रुपयांनी उतरून ४५,0७५ रुपये किलो झाली. जागतिक बाजारातही सोने तेजाळले. लंडनमध्ये सोन्याचा भाव 0.१५ टक्क्यांनी वाढून १,३३८.९0 डॉलर प्रति औंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३१,२५0 रुपये आणि ३१,१00 रुपये तोळा झाला. काल सोने १५0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र २४,३00 रुपयांवर स्थिर राहिला. दिल्लीत तयार चांदीचा भाव ३२५ रुपये घसरून ४५,0७५ रुपये किलो तर साप्ताहिक डिलिव्हरीच्या भाव २९0 रुपयांनी घसरून ४४,४९0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ७५ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७६ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला. >२0१६ च्या पहिल्या सात महिन्यांत भारताची सोने आयात ५७ टक्क्यांनी घसरून २१५ टनांवर आली आहे. संपूर्ण वर्षात ही घसरण ६0 टक्के होऊन आयात ३५0 टनांवर येईल. हा गेल्या दोन दशकांतील नीचांक आहे. - सुनील कश्यप, व्यवस्थापकीय संचालक, ग्लोबल बँकिंग अँड मार्केटस्, स्कॉटिया बँक
शुद्धीकरण उद्योगास सोने तस्करीचे ग्रहण
By admin | Published: August 25, 2016 6:38 AM