Join us

स्टेंट्सची टंचाई केल्यास कारवाई

By admin | Published: February 18, 2017 12:56 AM

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या स्टेंट्सची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या काही कंपन्यांवर आमचे कटाक्षाने लक्ष आहे. अशा कंपन्यांविरुद्ध

मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या स्टेंट्सची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या काही कंपन्यांवर आमचे कटाक्षाने लक्ष आहे. अशा कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने शुक्रवारी म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी स्टेंटच्या किमती ८५ टक्क्याने खाली आणल्यानंतर काही रुग्णालयांनी, डॉक्टरांनी तसेच पुरवठादारांनी जाणीवपूर्वक त्यांची टंचाई निर्माण केल्यामुळे केंद्र सरकारने हा इशारा दिला आहे. पत्रपरिषदेत केंद्रीय रसायने व खत मंत्री अनंत कुमार यांनी हा इशारा दिला. केंद्र सरकारने १३ फेब्रुवारी रोजी निव्वळ मेटल स्टेंट्सची किंमत ७,२६० व ड्रग एल्युटिंग स्टेंट्सची किंमत २९,६०० ठरवली आहे. अनेक इस्पितळे, डॉक्टर्स व पुरवठादार अव्वाच्या सव्वा दराने त्यांची विक्री करीत आहेत आणि आताही रुग्णांकडून अधिक पैसे उकळण्यासाठी त्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करीत आहेत वा ते बाजारात उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथॉरिटी (एनपीपीए), ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया (डीसीजीआय) तसेच आरोग्य मंत्रालयाने किमती मर्यादेत ठेवून बाजारात पुरेशा प्रमाणात कारोनरी स्टेंट्स उपलब्ध कराव्यात, असे कंपन्यांना सांगितले आहे. स्टेंट्सची कृत्रिम टंचाई निर्माण करणे व ठरावीक किमतीत त्या न विकण्यासारखे अनैतिक कृत्य करणाऱ्या कंपन्यांवर आमचे बारीक लक्ष आहे व त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे अनंत कुमार म्हणाले. देशात हृदयरुग्णांना पुरेशा प्रमाणात कारोनरी स्टेट्ंस उपलब्ध होतील यासाठी सरकार सर्व काही उपाययोजना करील, असे त्यांनी म्हटले. स्टेंट्सची कृत्रिम टंचाई नाहीशी करण्यासाठी औषध विभागाने स्वतंत्रपणे एपीपीए, डीसीजीआय आणि आरोग्य मंत्रालयाला उपाययोजना करण्यासाठी पत्रे लिहिली आहेत. नव्या किमतीत स्टेट्ंस उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली काही उत्पादक, वितरक आणि आयातदार रुग्णालयांतून त्या मागे घेत आहेत. त्यामुळे त्यांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)