कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम खूप प्रचलित झाले होते. आजही अनेक कंपन्यांमध्ये मग ती आयटी असो की अन्य कोणती घरातून काम करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देत आहे. अनेकजण यासाठीच कंपन्याही बदलत आहेत. परंतू यातील काहीजण याचा गैरफायदा घेत असून कंपनीच्या कामासोबतच ते आणकी काही ठिकाणची कामे करत आहेत. यावरून गेल्याच महिन्यात विप्रोचे अध्यक्ष भडकले होते.
टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. हे घरून काम करताना सोपे होत आहे. यावर विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी ही आमच्यासोबत धोकेबाजी असल्याचे म्हटले होते. आता विप्रोने अशी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणली आहे. विप्रोने दुसऱ्या कंपनीतही काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. हा शब्द अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरला जातो ज्यांनी गुप्तपणे दुसरी नोकरी देखील स्वीकारली आहे. म्हणजेच आधीच्या कंपनीमध्ये काम करत असताना लपवून ठेवून ते दुसऱ्या कंपनीसाठी काम करत आहेत. दुसरी नोकरी करण्याविरोधात प्रेमजी नाहीत, त्यांना यामध्ये पारदर्शकता हवी आहे, असे विप्रोच्या अधिकाऱ्याने म्हटले.
प्रेमजी एका कार्यक्रमात म्हणाले की, "तुम्ही मूनलाइटिंगची व्याख्या पाहिली तर, ते गुप्तपणे दुसरे काम करतात असा आहे. मी पारदर्शकतेबद्दल बोलत आहे. पारदर्शकतेचा एक भाग म्हणून, कंपन्यांमधील व्यक्ती खूप प्रामाणिकपणे चर्चा करू शकतात." विप्रोच्या बाबत बोलायचे झाले, तर या कर्मचाऱ्यांनी विप्रोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम केलेले आहे. यामुळे हा दगा ठरत आहे, असेही प्रेमजी म्हणाले.
विप्रोच्या इशाऱ्यानंतर इन्फोसिसने देखील आपल्या कर्मचार्यांना कंपनीला न कळवता दुसरी नोकरी न करण्याचा इशारा दिला आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीएफओ) एनजी सुब्रमण्यम यांनी ही एक नैतिक समस्या असल्याचे म्हटले आहे. टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांनी कर्मचार्यांना अतिरिक्त पैसे कमविण्याची ही संधी असल्याचे म्हटले आहे. परंतू याचे समर्थन करताना त्यांनी कंपनीसोबत फ्रॉड करण्यावरून इशाराही दिला आहे.