Join us

काळा पैसाप्रकरणी होणार कारवाई

By admin | Published: September 21, 2015 11:01 PM

बेकायदा, काळा पैसा दिलेल्या मुदतीत (३० सप्टेंबर) जाहीर न केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल

नवी दिल्ली : बेकायदा, काळा पैसा दिलेल्या मुदतीत (३० सप्टेंबर) जाहीर न केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) स्पष्ट केले आहे. मंडळाने बेकायदा व काळा पैसा जाहीर करण्यासाठी ९० दिवसांची एक खिडकी योजना जाहीर केलेलीआहे. मंडळाच्या अध्यक्षा अनिता कपूर म्हणाल्या की, ३० सप्टेंबरपर्यंत ज्यांना कोणाला आपल्याकडील काळा वा बेकायदा पैसा जाहीर करायचा आहे त्यांचा कोणताही छळ होणार नाही व मंडळाकडे आलेली त्यांची माहिती गुप्त राखली जाईल. या जाहीर झालेल्या काळ्या पैशांवरील कर व दंड ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत भरावा लागेल. उद्या काही तरी दडवण्यात आले आहे किंवा काळा पैसा असलेल्याने रिटर्न भरला नाही, असे आढळल्यास त्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर असेल. एक खिडकी योजनेचा उपयोग तुम्ही केला नाही, असे समोर आल्यास तुम्ही मुद्दाम विदेशी मालमत्ता दडवून ठेवल्याचे समजले जाईल. तुम्ही कायदा चुकविला की त्याचे सगळे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असे अनिता कपूर यांनी सांगितले.नव्या काळा पैसा विरोधी कायद्याचा वापर करून करदात्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप अनिता कपूर यांनी फेटाळून लावला. या कायद्याची अंमलबजावणी अजून पूर्णांशाने सुरूही झालेली नाही. त्यामुळे आधीच छळाचा आरोप करणे चुकीचे आहे. काही हितसंबंधी लोकांकडून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वातावरण खराब करून कर अधिकाऱ्यांचे नीतिधैर्य खचविण्याचा हा प्रयत्न आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)