अमेरिकन फर्म वॉल्ट डिस्ने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं भारतात आपला स्ट्रीमिंग आणि टेलिव्हिजन व्यवसाय विकण्याची तयारी सुरू केली आहे. यासोबतच ओटीटी व्यवसायातही नवं वॉर सुरू झालं आहे. हे बिझनेस वॉर अंबानी आणि अदानी ग्रुपमध्ये आहे. वॉल्ट डिस्ने आपला भारतीय व्यवसाय विकण्यासाठी खरेदीदार शोधत आहे. यासाठी ते अदानी आणि सन टीव्हीच्या संपर्कात आहे. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि सन टीव्हीचे मालक कलानिधी मारन डिस्नेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीये.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, वॉल्ट डिस्ने कंपनी आपल्या भारतीय व्यवसाय गुंडाळण्यासाठी अनेक कंपन्यांशी चर्चा करत आहे. यासाठी अदानी डिस्नेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांमध्ये बोलणी झाली तर डिस्नेचा भारतीय व्यवसाय अदानी समूहाच्या हाती येईल. अशा परिस्थितीत ओटीटीच्या लढाईत अंबानी आणि अदानी दोघेही आमनेसामने येतील. अंबानी समूहाने यापूर्वीच जिओ सिनेमाच्या माध्यमातून या व्यवसायात प्रवेश केला आहे. डिस्ने अदानींच्या हाती आल्यास जिओला ओटीटीवर डिस्नेकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.
जिओमुळे डिस्नेला मोठं नुकसान
हा करार झाल्यास अदानींचा मीडिया व्यवसाय विस्तारणार आहे. डिस्ने आपला भारतीय व्यवसाय विकण्यासाठी अनेक पर्यायांवर काम करत आहे. मात्र या वृत्ताबाबत डिस्नेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अदानी कंपनीच्या प्रवक्त्यानंही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आयपीएलचे स्ट्रीमिंग अधिकार गमावल्यानंतर डिस्नेचं मोठं नुकसान झालं आहे. जिओने सामन्याचे मोफत स्ट्रीमिंग केलं. जे डिस्नेसाठी खूप आव्हानात्मक होतं. आता भारतात खेळवल्या जात असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचं मोफत स्ट्रीमिंग करावं लागलं. वास्तविक, कंपनीनं आपल्या जुन्या ग्राहकांना परत आणण्यासाठी हा निर्णय घेतला.
भारतात Disney व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत, OTT साठी अदानी-अंबानी येणार आमने-सामने?
यापूर्वी जिओमुळे डिस्नेला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यातच आता वर्ल्डकपच्या सामन्यांचं मोफत स्ट्रिमिंग करावं लागत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:29 AM2023-10-07T10:29:42+5:302023-10-07T10:31:31+5:30