Join us

Adani Bangladesh Electricity : बांगलादेशनं वीजेचे थकवले ६७११ कोटी, आता अदानी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 11:39 AM

Adani Bangladesh Electricity : ही रक्कम न फेडल्यास बांगलादेशात वीज पुरवठा बंद केला जाऊ शकतो. पाहा काय आहे प्रकरण आणि काय म्हटलंय बांगलादेशनं.

Adani Bangladesh Electricity : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे बांगलादेशनं अब्जावधी रुपयांची रक्कम थकवली आहे. ही रक्कम अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरची आहे. बांगलादेशनं ही रक्कम भरली नाही तर या शेजारी देशावर नवे संकट उभं राहू शकतं. बांगलादेशात नुकतीच हिंसक निदर्शनं झाली होती. या आंदोलनादरम्यान शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. तर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा दिल्यानंतर देश सोडावा लागला होता. अशा परिस्थितीत अदानी पॉवरचे पैसे भरण्याची जबाबदारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर आहे.

अदानी पॉवर बांगलादेशसाठी वीजेचा पुरवठा करते. बांगलादेश अदानी पॉवरचे तब्बल ८० कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ६७११ कोटी रुपये देणे आहे. बांगलादेशातील सत्तांतरानंतर अदानींची ही रक्कम अडकली आहे. जाणकारांनुसार जर बांगलादेशनं ही रक्कम फेडली नाही, तर कंपनी बांगलादेशचा वीज पुरवठा थांबवू शकते. अशातच बांगलादेशात वीजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अदानी पॉवर झारखंडमधील आपल्या पॉवर प्रकल्पातून बांगलादेशला वीजेचा पुरवठा करते.

बांगलादेश सरकारला माहिती

बांगलादेशच्या अंतरिम सरकारला या थकित रकमेची पूर्ण माहिती आहे. बांगलादेश बँकेचे नवे गव्हर्नर अहसान एच मन्सूर यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत जर आम्ही अदानी पॉवरला ही रक्कम दिली नाही तर कंपनी आम्हाला वीज पुरवठा बंद करेल. अंतरिम सरकार या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. सध्या अदानी पॉवरची वीज पुरवठा खंडित करण्याची कोणतीही योजना नाही. मात्र, कर्जदार आणि कोळसा पुरवठादारांनी कंपनीवर दबाव आणला तर त्याला कठोर पावले उचलावी लागू शकतात, असं म्हटलं जात आहे.

कंपनीवर होणार परिणाम

बांगलादेशने हे पैसे उशीरा दिल्यास त्याचा परिणाम कंपनीच्या कामकाजावरही होणार आहे. खरं तर अदानी समूह गेल्या काही काळापासून देशाबाहेर आपला विस्तार करत आहे. त्यामध्ये शेजारी देश श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. बांगलादेशनं वीजची रक्कम दिली नाही किंवा उशीर केला तर अदानी समूहाच्या या देशांमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांना धक्का बसू शकतो.

टॅग्स :गौतम अदानीअदानीबांगलादेशवीज