Join us  

अदानींनी टाकले बिल गेट्स यांना मागे; श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी, एकूण संपत्ती ९.२ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 8:14 AM

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली :अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्ती वाढीचे रोज नवनवे विक्रम होत आहेत. अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे.

अदानी आशियातीलही सर्वांत श्रीमंत

अदानी या वर्षी ४ एप्रिल रोजी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले होते. ते आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीदेखील आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत. अदानी यांच्या पुढे केवळ आता फक्त ३ लोक आहेत. अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

अबब किती मोठी वाढ

अदानी ४ एप्रिल रोजी सेंटबिलियनर्स क्लबमध्ये सहभागी झाले होते. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंटबिलियनर्स  म्हणतात. याच्या एक वर्ष आधी म्हणजेच एप्रिल २०२१ मध्ये अदानींची एकूण संपत्ती ५७ अब्ज डॉलर होती. मात्र, केवळ एका वर्षामध्ये ही संपत्ती प्रचंड वाढली आहे.

किती आहे भांडवल? 

अदानी समूहाकडे २०० अब्ज डॉलर्सचे एकत्रित बाजार भांडवल असलेल्या सात सूचीबद्ध कंपन्या आहेत. निव्वळ संपत्तीच्या बाबतीत अदानी आशियातील पहिल्या, तर मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

टॅग्स :अदानी