Indian MEA on Adani Bribery Case : उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करत, अमेरिकेच्या न्याय विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणावर केंद्र सरकारची प्रतिक्रिया समोर आळी आहे. लाचखोरीच्या आरोपाखाली जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी(29 नोव्हेंबर 2024) सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत निवेदनात सांगितले की, 'अमेरिकेत गौतम अदानींच्या संस्थांशी संबंधित कायदेशीर कारवाईत भारत सरकारची कोणतीही भूमिका अथवा हस्तक्षेप नाही. ही खाजगी कंपनी आणि आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसमधील कायदेशीर बाब आहे. अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर मार्ग पाळले जातात.'
#WATCH | Delhi: On the Adani indictment issue, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, "This is a legal matter involving private firms and individuals and the US Department of Justice. There are established procedures and legal avenues in such cases which we believe would be… pic.twitter.com/w8CCLqU660
— ANI (@ANI) November 29, 2024
दरम्यान, भारतात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी अमेरिकेने गृह मंत्रालयाला माहिती देणे आवश्यक आहे. म्हणजेच काय तर, भारतात कारवाई करण्यासाठी अमेरिकेला भारत सरकारची परवानगी गरजेची आहे. माहिती मिळाल्यानंतर, गृह मंत्रालय संबंधित फेडरल एजन्सींना विनंतीवर कारवाई करण्याचे निर्देश देऊ शकते. अमेरिकन अधिकाऱ्यांना अदानींना अमेरिकेत आणायचे असेल, तर त्यांना भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराचा मार्ग स्वीकारावा लागेल. करारानुसार, यूएसला पुरावे सादर करावे लागतील.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान गौतम अदानी यांच्या कंपनीवर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सौरऊर्जेचा करार मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना मोठी लाच दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 2020 ते 2024 दरम्यान अदानी ग्रीन आणि अझर पॉवर ग्लोबलला हा सौर प्रकल्प मिळवून देण्यासाठी चुकीच्या मार्गाने भारतीय अधिकाऱ्यांना 265 मिलियन डॉलर्स (सुमारे 2236 कोटी रुपये) लाच दिल्याचा आरोप आहे.
लाचखोरीचे प्रकरण अमेरिकन कंपनी, म्हणजेच अझर पॉवर ग्लोबलपासून लपवण्यात आले. या कराराद्वारे 20 वर्षात दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याचा अंदाज होता आणि त्याचा फायदा घेण्यासाठी खोटे दावे करून कर्ज आणि बाँड उभारले गेल्याचेही म्हटले आहे. मात्र, या आरोपांनंतर लगेचच एक निवेदन जारी करून अदानी समूहाने अमेरिकन तपास संस्थेचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.