Adani Cement : भारतातील सिमेंट उद्योग खुप मोठा आहे आणि या उद्योगात वर्चस्व गाजवण्यासाठी गौतम अदानी मोठी योजना आखत आहेत. याच योजनेचा भाग म्हणून त्यांनी दोन वर्षांपूर्वी अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी, या दोन कंपन्या खरेदी करुन सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला. आता ते या क्षेत्रात टॉपवर असलेल्या बिर्ला ग्रुपच्या अल्ट्राटेक सिमेंटशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.
विमानतळ, बंदरे, अन्न, ऊर्जा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अदानी समूहाने आता सिमेंट क्षेत्रात आघाडीवर होण्याची योजना आखली आहे. परंतु सध्याच्या आदित्य बिर्ला समूहाकडे आघाडीच्या अल्ट्राटेक सिमेंटची मालकी आहे आणि ती वेगाने वाढत आहे. आदित्य बिर्ला यांच्या अल्ट्राटेक सिमेंटशी स्पर्धा करणे अदानींसाठी सोपी गोष्ट नाही.
अदानी समूहाचा सिमेंट व्यवसायअदानी सिमेंट्सने सांगितले की, त्यांच्याकडे 8,000 मिलियन मेट्रिक टन चुनखडीचा साठा आहे, जो सिमेंट उद्योगासाठी महत्त्वाचा कच्चा माल आहे. याशिवाय, 40 टक्के फ्लाय ॲशची आवश्यकता आहे, जी 2028 पर्यंत 50 टक्क्यांहून अधिक होईल. सध्या अदानी सिमेंट ही या क्षेत्रातील अल्ट्राटेक सिमेंट नंतर दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
तर, दुसरीकडे अल्ट्राटेकने या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये दोन ग्रीनफिल्ड युनिट्स सुरू करून 150 मिलियन टन उत्पादन क्षमता ओलांडली आहे. अल्ट्राटेकची उत्पादन क्षमता 200 मिलियन टनांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. याच टॉपवर असलेल्या अल्ट्राटेकला मागे टाकण्यासाठी अदानी सिमेंट मोठी योजना आखत आहे.