Join us  

अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 9:42 AM

सीतारामन म्हणाल्या की, बँका आणि विमा कंपन्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की, भारतीय बाजारपेठांवर नियामकाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवले जाते.

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे प्रचंड कोसळलेले शेअर्स हे केवळ एका कंपनीशी संबंधित प्रकरण असून, भारताच्या प्रतिमेला यामुळे धक्का लागणार नाही. असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सेबी आणि रिझर्व्ह बँकेसारख्या नियामकांनी शेअर बाजार स्थिर ठेवण्यासाठी सदैव जागृत असले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सीतारामन म्हणाल्या की, बँका आणि विमा कंपन्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की, भारतीय बाजारपेठांवर नियामकाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवले जाते. बँका आणि विमा कंपन्या स्वतः पुढे येत असून अदानी समूहाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करीत आहेत, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, “त्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त पैसे गुंतवलेले नाहीत, असे त्या कंपन्या स्वतः पुढे येऊन सांगत आहेत.

सेबीने काय करायला हवे? या प्रकरणात नियामकांच्या भूमिकेबद्दल विचारले असता, सीतारामन म्हणाल्या, “माझे एकच मत आहे की नियामक, मग ते आरबीआय असो किंवा सेबी, त्यांनी वेळेत कारवाई  करायला हवी आणि बाजार स्थिर ठेवण्यासाठी  काम करायला हवे. नियामकांनी नेहमी जागरूक असले पाहिजे असे माझे मत आहे.

एलआयसीला दणकाहिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळत असल्याने एलआयसी, म्युच्युअल फंड आणि परकीय गुंतवणूकदारांचे तब्बल दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. २४ जानेवारी रोजी या तिघांकडे अदानी समूहाचे ३ लाख ९८ हजार ५६३ कोटी रुपयांचे शेअर्स होते. या कालवधीत त्यांचे मूल्य केवळ १ लाख ९० हजार कोटी झाले आहे.

बाजाराला लहान-मोठे धक्के बसत आहेत...होय, बाजाराला अधूनमधून छोटे मोठे धक्के बसले आहेत. परंतु सेबी, आरबीआय हे नियामक सर्व गोष्टींची काळजी घेतात. अदानी प्रकरणातही सेबी योग्य प्रकारे कारवाई करीत आहे, असे त्या म्हणाल्या.  हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात शेअरच्या किमती वाढविण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप केल्यानंतर समूहाचे बाजार भांडवल १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त घसरले आहे.

कुणी दिले कर्ज? - एसबीआय २७ हजार कोटी- पीएनबी ७ हजार कोटी- बँक ऑफ बडोदा एक चतुर्थांश- जम्मू काश्मीर बँक २५० कोटी- एलआयसी ५७ हजार कोटी

३ वर्षांत दुप्पट कर्ज - २ लाख कोटी रुपयांचे कर्ज अदानी समूहावर सध्या आहे. ३ वर्षांत अदानी समूहावरील कर्ज दुप्पट झाले आहे. - ८० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी कर्ज भारतीय बँकांनी दिले आहे. ४२,७५९ कोटींचा फटका अदानी समूहामुळे एलआयसीला बसला आहे.

६० अब्ज डॉलरची वाढ गेल्या काही दिवसांत परकीय चलनाच्या साठ्यात झाली आहे. त्यामुळे अदानी समूहामुळे भारताच्या परकीय भांडवल येण्यावर काहीही परिणाम नाही.        - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

 

टॅग्स :निर्मला सीतारामनगौतम अदानीभाजपाव्यवसाय