नवी दिल्ली-
भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरात दर दिवसाला तब्बल १,००२ कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण संपत्ती ५,०५,९०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. याआधीच्या वर्षात हा आकडा १,४०,२०० कोटी इतका होता. अदानींनी यंदा विक्रमी झेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चीनचे सुप्रसिद्ध बाटलीबंद पाण्याचे उद्योजक झोंग शानशान (Zhong Shanshan) यांना मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी असले तरी गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत केवळ ९ टक्के वाढ झाली आहे. तर गौतम अदानी यांच्या संपत्तीतील वाढ तब्बल २६१ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. वेल्थ ह्युरेन इंडिया रिच लिस्ट २०२१ (IIFL) नं याबाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे.
आशियातील श्रीमंतांपैकी भारतीयांच्या यादीत यंदा पहिल्यांदाच टॉप-१० मध्ये गौतम अदानी यांच्यासह त्यांचा दुबईस्थित भाऊ विनोद शांतिलाल अदानी यांचाही समावेश झाला आहे. गौतम अदानी यांच्या स्थानात दोन स्थानांची बढत होऊन ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर विनोद अदानी यांच्या स्थानात तब्बल १२ स्थानांची बढत झाली असून ते आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. विनोद अदानी यांची संपत्ती १,३१,६०० कोटी इतकी असून गेल्या वर्षभरात २१.२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांच्याशी तुलना करायची झाल्यास मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षभरात दर दिवशी १६९ कोटींची कमाई केली आहे. त्यांच्या संपत्तीत ९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून ७,१८,००० कोटी इतकी संपत्तीची नोंद झाली आहे. तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल २६१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात गौतम अदानींनी दिवसाला १,००२ कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण संपत्ती ५,०५,९०० कोटी इतकी झाली आहे.
उद्योगपती शिव नाडर यांच्या संपत्तीत ६७ टक्क्यांची वाढ झाली असून २,३६,६०० कोटींच्या संपत्तीसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर एसपी हिंदुजा २,२०,००० कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. सायरस पुनावाला यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात ७४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ते १,६३,७०० कोटींच्या संपत्तीसह यादीत सहाव्या स्थानावर आहेत.