Gautam Adani Enterprises: हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाला आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप १० मध्ये जागा मिळवलेल्या गौतम अदानी यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला. मात्र, कंपनीने यावर त्वरेने पावले उचलून धोरणात्मक निर्णय घेत गुंतवणूकदारांचा विश्वास कायम राखण्याचा प्रयत्न केला. हळूहळू अदानी ग्रुप या तडाख्यातून सावरताना दिसत आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपले तिमाहीचे निकाल केले. यात कंपनीला दुपटीने नफा मिळाला आहे. त्यामुळे आता गौतम अदानी यांनाच चेअरमनपदी कायम ठेवण्यावर संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे.
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूहाने व्यावसायिक क्षेत्रात अनेक टप्पे प्रस्थापित केले आहेत. मेहनतीच्या जोरावर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. मोठे साम्राज्य उभे केले. अदानी एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून गौतम अदानी यांची पुनर्नियुक्ती १ डिसेंबर २०२३ पासून लागू झाली असून, त्यांचा हा कार्यकाळ ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपत आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे मार्च तिमाही निकाल जाहीर करताना, बोर्डाने पुन्हा गौतम अदानी यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. ही पुनर्नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल, असे सांगितले जात आहे.
कंपनीच्या महसुलात २६ टक्क्यांनी जोरदार वाढ
अदानी एंटरप्रायझेसचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तिमाही निकालांमध्ये कंपनीचा एकत्रित नफा दुपटीने वाढून ७२२ कोटी रुपये झाला आहे. तसेच या कंपनीच्या महसुलात २६ टक्क्यांनी जोरदार वाढ झाली आहे. नफ्यासोबतच अदानी एंटरप्रायझेसचे उत्पन्नही वाढले आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न २४८६६ कोटी रुपयांवरून ३१३४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
दरम्यान, कंपनीच्या उत्कृष्ट तिमाही निकालानंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना बंपर भेटही दिली आहे. अदानी एंटरप्रायझेसने कंपनीच्या प्रत्येक शेअरवर १२० टक्क्यांचा लाभांश जाहीर केला आहे. कंपनी तिच्या सर्व गुंतवणूकदारांना प्रति शेअर १.२० रुपये लाभांश देईल. कंपनीच्या निकालानंतर अदानी एंटरप्रायझेसला तर दिलासा मिळाला आहेच, पण ज्या गुंतवणूकदारांनी आपले पैसे कंपनीत गुंतवले आहेत त्यांनाही दिलासा मिळणार आहे.