नवी दिल्ली - ‘टेनसेंट होल्डिंग्ज’ आणि ‘अलिबाबा ग्रुप’ने तब्बल १४० कोटी चिनी नागरिकांना आपल्या ॲप्सच्या माध्यमातून जोडून घेतले आहे. अशाचप्रकारे ग्राहकांना जोडून घेण्यासाठी भारतीय उद्योजकांनीही पुढाकार घेतला आहे. ग्राहकांना सर्व व्यवहारांसाठी उपयोगी पडू शकेल असे सुपरॲप विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनीही आता सुपरॲपच्या दुनियेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
कपडे, कारपासून फ्लाइट तिकीटांची विक्री करणाऱ्या टाटा ग्रुपने २०२२ च्या सुरुवातीला ‘टाटा न्यू’ ॲप सुरु केले. आशियातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या सेवा आणि मनोरंजन क्षेत्रातील ग्राहक ‘माय जिओ’च्या प्लॅटफॉर्मवर आणले. अदानी समूहाने या दशकाच्या अखेरपर्यंत ३३% भारतीयांना ‘अदानी वन’च्या माध्यमातून एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. सध्या देशभरात ‘अदानी वन’चे ३ कोटी इतके युजर्स आहेत. या ॲपवर प्रवाशांना विमानांचे तसेच हॉटेलचे बुकिंग करता येते. मार्च महिन्यात संपलेल्या आर्थिक वर्षात ॲपवर एकूण ७५० कोटी रुपयांचे व्यवहार झाले.
ऊर्जा, नैसर्गिक वायू, रिअल्टी उद्योगामुळे युजर्स वाढविण्याची संधी
यूपीआय व्यवहारांसाठी परवाना मागितला आहे. त्यामुळे मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात उतरता येईल. जूनच्या सुरुवातीलाच अदानी समूहाने आयसीआयसीआय बँकेसोबत एक क्रेडिट कार्ड लॉँच केले आहे. समूह १.३ कोटीहून अधिक घरांना वीज आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करतो. हे ग्राहक मिळू शकतात. गॅस-ईव्ही चार्जिंग स्टेशन, फूड आउटलेट, रिअल्टी नेटवर्कमधील ग्राहकांमुळे लाभ होऊ शकतो. डिजिटल ग्राहकांचा आणखी विस्तार व्हावा यासाठी कंपनी गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयसीआयसीआय बँक, सिटिबँक आणि पेमेंट फर्म पाईन लॅब्स यांच्यासोबत विशेष रणनीतीवर काम करीत आहे.