Join us  

Adani Files: मिस्टर अदानींच्या स्वप्नांना मोठा सुरुंग! फ्रेंच कंपनीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रोजेक्ट थांबविला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 8:04 PM

मिस्टर अदानी यांच्याकडे सध्या इतर अनेक गोष्टी हाताळण्यासारख्या आहेत. त्यामुळे ऑडिट चालू असताना भागीदारी निलंबित करणे चांगले होईल, असे फ्रेंच कंपनीने म्हटले आहे. 

हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानींच्या साम्राज्याला आलेला भूकंप काही थांबायचे नाव घेत नाहीय. भारतीय शेअर बाजारात अदानींच्या शेअरला आज चांगला दिवस दिसला असला तरी फ्रान्सच्या बड्या कंपनीने याच दिवशी मोठा झटका दिला आहे. तब्बल ५० अब्ज डॉलर्सचा प्रोजेक्ट या कंपनीने थांबविला आहे. 

Adani Power: काय चाललेय? अदानींच्या या कंपनीचा ९६ टक्के नफा घटला, तरी शेअरला अप्पर सर्किट...

अदानींच्या कंपन्यांमध्ये या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. अदानींसोबतच्या हायड्रोजन प्रकल्पातील भागीदारी फ्रान्सच्या टोटल एनर्जी कंपनीने स्थगित केली आहे. अदानी समूहासोबतची भागीदारी गेल्या वर्षी जूनमध्ये जाहीर करण्यात आली होती. परंतू त्या करारावर अद्याप स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या, असे फ्रेंच समूहाचे मुख्य कार्यकारी पॅट्रिक पोयाने यांनी सांगितले.

Total Energies अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) मध्ये 25 टक्के इक्विटी घेणार होती. ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम विकसित करण्यासाठी 50 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह 2030 पर्यंत 10 लाख टन हरित ऊर्जा निर्माण करण्याचे अदानी समूहाचे उद्दिष्ट आहे. त्याला मोठा धक्का बसला आहे. आमच्यासाठी गोष्टी स्पष्ट होईपर्यंत हायड्रोजन प्रकल्प थांबविला जाईल, असे स्पष्टपणे पोयाने यांनी सांगितले आहे.

अदानी ग्रुपमध्ये $3.1 बिलियनची गुंतवणूक असलेली टोटल एनर्जी ही हिंडनबर्ग रिपोर्टमुळे चिंतेत आहे. लेखा आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अदानीच्या ऑडिट रिपोर्टची वाट पाहत आहे. मिस्टर अदानी यांच्याकडे सध्या इतर अनेक गोष्टी हाताळण्यासारख्या आहेत. त्यामुळे ऑडिट चालू असताना भागीदारी निलंबित करणे चांगले होईल, असे फ्रेंच कंपनीने म्हटले आहे.  

टॅग्स :अदानीफ्रान्स