Adani Green Energy Q3 Result: चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) अदानी ग्रीन एनर्जीचा निव्वळ नफा 148 टक्क्यांहून अधिक वाढून 256 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 103 कोटी रुपये होता. या वाढीमुळे सोमवारी कंपनीचे शेअर्स 5.1% वाढून रु. 1750 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते.
या स्टॉकने 27 जानेवारी 2023 रोजी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. तर त्याची 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 439.35 रुपये आहे. दरम्यान, कंपनीचे मार्केट कॅप रु. 2,71,851.65 कोटी आहे.
कंपनीने काय म्हटले?शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत अदानी ग्रीन एनर्जीने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून 2,675 कोटी रुपये झाले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 2,256 कोटी रुपये होते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमित सिंग यांनी सांगितले की, आम्ही 2030 पर्यंत 45 GW क्षमतेच्या सुरक्षित वाढीसाठी फ्रेमवर्क तयार केले आहे. आम्ही पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करुन स्थानिकीकरण, मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन, कार्य विस्तार आणि क्षमता निर्माण करण्यावर भर देत आहोत. तसेच, गुजरातच्या खवरा येथे जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंपनी काम करत आहे.