Join us

अदानी ग्रुपची सोलार सेक्टरमध्ये मोठी घोषणा; शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 5:41 PM

Adani Green Energy Share: अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्मध्ये आज 3.5% टक्के वाढ झाली.

Adani Green Energy Share: उद्योगपती गौतम अदानी यांच्या ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली वाढ झाली. शेअर्स 3.5%ने वाढून 1882 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे दोन मोठी कारणे आहेत. पहिले कारण- अदानी ग्रीन एनर्जीने गुजरातमधील खवरा रिन्युएबल एनर्जी (RE) पार्कमध्ये 551 मेगावॅट सोलार कॅपेसिटी सुरू करण्याची घोषणा केली आहे. या RE पार्कमध्ये 30 GW अक्षय ऊर्जा क्षमता विकसित करण्याची कंपनीची योजना आहे, जी पुढील पाच वर्षांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. 

ही योजना पूर्ण झाल्यानंतर खवरा RE जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क असेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. दुसरे कारण- मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने मंगळवारी संध्याकाळी अदानी समूहाच्या 4 कंपन्यांचे अपग्रेडेशन केले. हे रेटिंग आता 'निगेटिव्ह' मधून 'स्टेबल' करण्यात आले आहे. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जीचाही समावेश आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर मूडीजने या 4 कंपन्यांची रेटिंग स्टेबलवरुन निगेटिव्ह केली होती. त्यावेळी मूडीजने कॅफिटल अॅक्सेस आणि कॅपिटल लॉसबाबत चिंताही व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, अदानी ग्रीन एनर्जी ही देशातील सर्वात मोठी आणि जगातील आघाडीची रिन्यूएबल एनर्जी सॉल्यूशन प्रोव्हायडरआहे.

कंपनीच्या नफ्यात 148 टक्क्यांनी वाढ अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत 148 टक्क्यांहून अधिक वाढून 256 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 103 कोटी रुपये होता. कंपनीने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून रु. 2,675 कोटी झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत रु. 2,256 कोटी होते.

ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी सांगितले की, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 2,100 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. एका महिन्यासाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज रु. 1,700 आणि रु. 2,150 च्या दरम्यान असेल. तसेच, शेअर्सचा सपोर्ट रु. 1,746 वर असेल तर प्रतिरोध रु. 1,990 वर असेल. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च किंमत रु. 1,991.60 आहे. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप रु. 2,94,194.43 कोटी रुपये आहे.

(टीप-हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगौतम अदानीअदानी