माध्यम क्षेत्रात गौतम अदानी समूहाचा दबदबा वाढताना दिसत आहे. आता अदानी समूहाने IANS इंडिया प्राइव्हेट लिमिटेडमध्ये मोठी हिस्सेदारी मिळवली आहे. अदानी एंटरप्रायजेसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या इक्विटी शेअर्समध्ये 50.50 टक्के हिस्सेदारी मिळवली आहे. मात्र, कंपनीने अधिग्रहण मूल्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही.
अदानी समूहाने स्टॉक एक्सचेन्ज फायलिंगमध्ये म्हटले आहे, "एएमएनएलने IANS आणि IANS चे एक शेअरधारक संदीप बामजई यांच्यासोबत IANS संदर्भात आपल्या परस्पर अधिकारांची नोंद करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. एवढेच नाही, तर AMNL कडे IANS चे सर्व ऑपरेटिंग आणि व्यवस्थापन नियंत्रण असेल. तसेच IANS चे सर्व संचालक नियुक्त करण्याचा अधिकारदेखील असेल, असेही अदानी समूहाने म्हटले आहे.
अदानी यांनी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात माध्यम क्षेत्रात पाय ठेवला होता. समूहाने क्विंटिलियन बिझनेस मीडियाच्या अधिग्रहणाची घोषणा केली. हे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म बीक्यू प्राइमद्वारे ऑपरेट केले जाते. यानंतर, डिसेंबरमध्ये ब्रॉडकास्टर एनडीटीव्हीमध्ये सुमारे 65 टक्के हिस्सेदारी घेतली. IANS चा 2022-23 या आर्थिक वर्षातील (एप्रिल 2022 ते मार्च 2023) महसूल 11.86 कोटी रुपये होता.