Join us  

Adani Group : तिकडे कंपनी झाली दिवाळखोर, इकडे अदानींनी धरला हात! फ्लॉप फर्म्समधून कसं केलं साम्राज्य मजबूत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 9:32 AM

Adani Group : उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह पूर्वी वीज आणि बंदरांसाठी ओळखला जात होता. आता रिअल इस्टेट, सिमेंट, एफएमसीजी, मीडिया अशा क्षेत्रांमध्येही समूहानं झपाट्यानं प्रगती केलीये.

Gautam Adani News : उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह पूर्वी वीज आणि बंदरांसाठी ओळखला जात होता. आता रिअल इस्टेट, सिमेंट, एफएमसीजी, मीडिया अशा क्षेत्रांमध्येही समूहानं झपाट्यानं प्रगती केलीये. झपाट्यानं वाढण्यासाठी त्याची खास रणनीती आहे. ती म्हणजे दिवाळखोर कंपन्या विकत घेऊन त्यांचं पुनरुज्जीवन करणं. २०१८ मध्ये रुची सोयासाठी पतंजलीसोबत झालेल्या स्पर्धेनंतर अदानींनी दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहितेअंतर्गत (आयबीसी) अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं.

याची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा दिवाळखोरीत गेलेली खाद्यतेल कंपनी रुची सोया विकत घेण्याचा प्रयत्न अदानी विल्मरनं केला. मात्र, निविदा प्रक्रियेतील वादानंतर अदानींनी आपला प्रस्ताव मागे घेतला. अखेर पतंजलीनं रुची सोया विकत घेतली. त्यानंतर अदानी पॉवरनं अवंता समूहाची कोरबा वेस्ट पॉवर कंपनी २९०० कोटी रुपयांना विकत घेतली. त्यानंतर जीएमआर छत्तीसगड एनर्जी ३,५३० कोटी रुपयांना विकत घेण्यात आली. त्यापाठोपाठ एस्सार पॉवर (२५०० कोटी), कोस्टल एनर्जेन (३५०० कोटी) आणि लॅन्को अमरकंटक पॉवर (४,१०१ कोटी) या कंपन्यांचं अधिग्रहण करण्यात आलं.

अदानी पॉवरची नजर आता केएसके महानदी पॉवरवर आहे. त्यासाठी २७ हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे. जर हा करार झाला तर आयबीसी अंतर्गत अदानी समूहाच्या कोणत्याही कंपनीकडून लावण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च बोली असेल.

रिअल इस्टेट क्षेत्रात अदानी प्रॉपर्टीजनं आदित्य इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड (४०० कोटी रुपये), नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन आणि HDIL च्या शाहेद महाराष्ट्र लँड्स अँड प्रोजेक्ट बीकेसीचं अधिग्रहण केलं आहे. अदानी गुडहोम्सनं रेडियस इस्टेट अँड डेव्हलपर्स ७६ कोटी रुपयांना विकत घेतले. बंदर क्षेत्रात अदानी पोर्ट्स अँड सेझनं दिघी बंदर (७०५ कोटी) आणि कराईकल बंदर (१,४८५ कोटी रुपये) विकत घेतलं आहे.

आता सीमेंट क्षेत्रावर नजर

आता अदानी समूहाची नजर सिमेंट क्षेत्रावर आहे. अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडमधील बहुसंख्य हिस्सा विकत घेऊन अदानी समूह भारतातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. समूह आता जेपी ग्रुप आणि वडराज सिमेंटसारख्या कंपन्यांचं अधिग्रहण करण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानी