नवी दिल्ली: कोरोना संकटाचा संपूर्ण देशाला चांगलाच तडाखा दिला आहे. या संकटाच्या कालावधीत भारतातील अनेक उद्योगांना घरघर लागली. लाखो नोकऱ्या गेल्या. मात्र, या कालावधीत गौतम अदानी यांच्या Adani ग्रुपला जबरदस्त फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. यातच अदानी ग्रुपच्या एका कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. शेअर मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २ महिन्यात अदानी ग्रुपच्या या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल २०० टक्क्यांचा परतावा देऊन मालामाल केले आहे.
Adani समूहातील अदानी विल्मर या कंपनीच्या शेअरने मागील अडीच महिन्यात गुंतवणूकदारांना २०० टक्के रिटर्न दिले आहे. अदानी विल्मरचा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आणि त्याने ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला. अदानी विल्मर सध्या सार्वकालीन उच्चांकावर ट्रेड करत आहे. गत महिनाभरात अदानी विल्मरचा शेअर तब्बल ७६ टक्क्यांनी वधारला आहे.
अदानी विल्मरच्या शेअरची मागणीत मोठी वाढ
रशिया-युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटल्यानंतर अदानी विल्मरच्या शेअरची मागणीत मोठी वाढ झालेली आहे. आठवडाभरात त्यात १५.७५ टक्के वाढ झाली आहे. अडीच महिन्यात या शेअरबाबत बड्या ब्रोकर्स संस्थांनी वर्तवलेले अंदाज सपशेल खोटे ठरले आहेत. अदानी विल्मरने आयपीओसाठी प्रती शेअर २३० रुपये किंमत ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात ८ फेब्रुवारी २०२२ रोजी अदानी विल्मरची २२१ रुपयांना नोंदणी झाली. मुंबई शेअर बाजारच्या मंचावर इश्यू प्राईसच्या तुलनेत तो ३.९ टक्के कमी दराने सूचीबद्ध झाला होता. मात्र, त्यानंतर या शेअरने घोडदौड कायम ठेवली आहे.
दरम्यान, बाजारातील वाढती महागाई, रशिया-युक्रेन युद्धाचे जागतिक बाजारपेठेवर होणारे परिणाम या घडामोडींचा खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात खाद्यवस्तू उत्पादक कंपन्यांच्या शेअरला मागणी आहे. त्याचाच फायदा अदानी विल्मरच्या शेअरला झाला आहे. अदानी विल्मर कंपनीची फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्य तेल, आटा, मैदा यासारखे उत्पादने आहेत.