Join us

घसरत्या बाजारातही रॉकेट बनला Adani चा 'हा' शेअर, बिझनेसबाबत झालीये मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 1:11 PM

शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. असं असलं तरी एका मोठ्या घोषणेनंतर अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी वाढ झाली.

अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मर लिमिटेडच्या  (Adani Wilmar) शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड वाढ झाली. शुक्रवारी अदानी विल्मरचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३७०.७५ रुपयांवर पोहोचला. गुरुवारी कंपनीचा शेअर ३४८.२० रुपयांवर बंद झाला होता. एका मोठ्या घोषणेनंतर अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने (एईएल) गुरुवारी कंपनीच्या फूड-एफएमसीजी व्यवसायाचं विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली आणि अदानी विल्मरमध्ये विलीन करण्यात मंजुरी दिली.

एंटरप्रायझेसचा  ४३.९४ टक्के हिस्सा

अदानी विल्मरमध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा ४३.९४ टक्के हिस्सा आहे. अदानी विल्मरमध्ये अदानी एंटरप्रायझेसचा हिस्सा अदानी कमोडिटीजच्या माध्यमातून आहे. विलीनीकरणानंतर अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या भागधारकांना अदानी एंटरप्रायझेसच्या प्रत्येक ५०० शेअर्समागे अदानी विल्मरचे २५१ समभाग किंवा त्याच प्रमाणात मिळतील. विलिनीकरण योजनेत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या अदानी कमोडिटीजमधील धोरणात्मक गुंतवणुकीचाही समावेश आहे. 

एंटरप्रायझेसचा नफा वाढला

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसनं चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत १४५४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसला गेल्या वर्षी याच तिमाहीत ६७४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचं उत्पन्न १२ टक्क्यांनी वाढून २५,४७२ कोटी रुपये झालं आहे.

वर्षभरात विल्मरच्या शेअर्समध्ये घसरण

गेल्या वर्षभरात अदानी विल्मरच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. २ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर ४००.४० रुपयांवर होता. २ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३७०.७५ रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी विल्मरच्या शेअरची ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी ४१४.४५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २८५.८५ रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजारअदानी