दोन दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात आणखी एका क्षेत्रात स्पर्धा होणार आहे. अंबानी यांनी ग्रीन एनर्जीमध्ये ७५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली आहे. तज्ञांच्या मते, कंपनीचा भर ग्रीन हायड्रोजनवर असू शकतो. ग्रीन हायड्रोजन हे पाणी आणि क्लिन एनर्जीपासून बनवले जाते आणि त्याला भविष्यातील इंधन म्हटले जात आहे. दरम्यान, देशात ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम तयार करण्यासाठी अदानी यांनी फ्रेंच कंपनी टोटल एनर्जी (Total Energies) सोबत हातमिळवणी केली आहे. त्यानुसार, टोटल एनर्जी अदानी समूहाची कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) मधील २५ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. अदानी समूह आणि टोटल यांच्यातील ही चौथी भागीदारी आहे. यापूर्वी, दोन्ही कंपन्यांनी एलएनजी टर्मिनल, सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन आणि सोलर पॉवरमध्ये भागीदारी केली आहे.
ग्रीन हायड्रोजनशी संबंधित या नवीन भागीदारीमुळे भारत आणि जागतिक स्तरावर एनर्जी लँडस्केपच्या बदलांची अपेक्षा करण्यात येत आहे. अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडचे पुढील १० वर्षांत ग्रीन हायड्रोजन आणि संबंधित इकोसिस्टममध्ये ५० बिलयन डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात एएनआयएल २०३० पूर्वी दरवर्षी १ मिलियन टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करेल.
अदानी-टोटलएनर्जीज भागीदारीचे धोरणात्मक मूल्य हे व्यावसायिकता आणि महत्वाकांक्षा या दोन्ही स्तरांवर खूप मोठे असल्याचे मत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्यक्त केले. जगातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लेयर बनण्याच्या आमच्या प्रवासात टोटल एनर्जीज सोबतची भागीदारी संशोधन आणि विकास, बाजारपेठेतील प्रवेश आणि अंतिम ग्राहकाची समज यासह अनेक बाबींना एकत्र करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“टोटलएनर्जीजचा अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडमधील प्रवेश हा आमच्या नूतनीकरणयोग्य आणि कमी कार्बन हायड्रोजन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. २०३० पर्यंत आमच्या युरोपातील इंधन शुद्धीकरण प्रकल्पामध्ये वापरले जाणार्या हायड्रोजनचे आम्हाला केवळ डिकार्बोनाइज करायचे नाही, तर याबाबतची मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनदेखील करावयाचे लक्ष्य आहे,” अशी प्रतिक्रिया टोटल एनर्जीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पोयाने यांनी दिली.