Adani Group Business: देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये अदानी समूहाचा व्यवसाय वाढवला आहे. आता त्यांचा मुलगा करण अदानी उद्योग क्षेत्र गाजवायला सज्ज झाला आहे. दरम्यान, अदानी समूह पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये 7 विमानतळांच्या विस्तारासाठी 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. या विमानतळांची क्षमता वाढवून कंपनीचे उत्पन्न वाढवण्याची योजना आहे. यात करण अदानी यांची महत्वाची भूमिका असणार आहे.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी अलीकडेच सांगितले होते की, अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स पुढील पाच वर्षांत एअरसाईडवर 30,000 कोटी रुपये खर्च करेल, तर पुढील 5 ते 10 वर्षांत सीटीसाईडसाठी 30,000 कोटी रुपये दिले जातील. याअंतर्गत 7 विमानतळांवर काम केले जाणार आहे. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, गुवाहाटी, जयपूर आणि तिरुवनंतपुरमचा समावेश आहे.
एअरसाइड आणि सिटीसाईड म्हणजे काय?
विमानतळाला दोन बाजू असतात, एक एअरसाइड आणि दुसरी सिटीसाइड. एअरसाइडमध्ये विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ केले जाते, ज्यामध्ये धावपट्टी, कंट्रोल टॉवर्स, विमानाची देखभाल आणि इंधन भरण्यासारख्या सर्व सुविधांचा समावेश असतो. तर सिटीसाईड विमानतळ व्यावसायिक फायद्यासाठी बांधले जातात. याअंतर्गत प्रवाशांसाठी विमानतळाभोवती व्यावसायिक सुविधा निर्माण केल्या जातात.
सोप्या शब्दात सांगायचे तर, एअरसाइड हे विमानतळाचे सुरक्षित क्षेत्र आहे, जिथे फक्त बोर्डिंग पास असलेल्या प्रवाशांना परवानगी असते, तर सिटीसाइड विमानतळाचे सार्वजनिक क्षेत्र आहे, जिथे कोणीही मुक्त प्रवेश करू शकतो.