मंगळुरू, लखनौ आणि अहमदाबादनंतर आता मुंबईविमानतळची धुरादेखील उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) कडे गेली आहे. कंपनीनं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) मधील २३.५ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं १,६८५.२५ कोटी रूपयांना हा हिस्सा परदेशी कंपन्या ACSA ग्लोबल लिमिटेड आणि बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (मॉरिशस) लिमिटेड (बिडवेस्ट) कडून खरेदी केला आहे. सध्या याव्यरिक्त कंपनी या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या प्रमोटर कंपनी GVK समूहाची ५०.५ टक्के हिस्सादेखील खरेदी करत आहे. या प्रकारे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडची मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमधील हिस्सा हा ७४ टक्क्यांवर पोहोचणार आहे. यासोबतच कंपनीला नवी मुंबईतील विमानतळ विकसित करण्याचा अधिकारही मिळेल. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं GVK एयरपोर्ट लिमिटेडच्या कर्जाला खरेदी करण्याचा करार केला होता. GVKDL एक होल्डिंग कंपनी आहे. याद्वारे GVK समूहाची MIAL मध्ये ५०.५० टक्के हिस्सा आहे.अदानींकडे एकूण किती विमानतळे?अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं MIAL चे १० रूपये मूल्याचे २८.२० कोटी शेअर खरेदी केले आहेत, अशी माहिती अदानी एन्टरप्रायझेसनं शेअर बाजाराला दिली. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही अदानी एन्टरप्राईझेसच्या मालकीची कंपनी आहे. GVK एअरपोर्ट डेव्हलपर्ससोबत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर MIAL मध्ये अदानी समूहाचा हिस्सा ७४ टक्के होईल. विमानतळाचा उर्वरित २६ टक्के हिस्सा हा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आहे. MIAL ची स्थापना २ मार्च २००६ रोजी करण्यात आली होती. ही कंपनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या विकासाचं, निर्मितीचं आणि परिचालनाचं काम करते. गेल्यावर्षीही अधिग्रहणअदानी समूहानं गेल्या वर्षी AAI कडून मंगळुरू, लखनौ आणि अहमदाबाद येथील विमानतळांचं अधिग्रहण केलं होतं. यावर्षी जुलैपर्यंत जयपूर, गुवाहाटी आणि तिरूवनंतरपुरम विमानतळांचंही अधिग्रहण करण्यात येणार आहे. अदानी समुहाकडे या सहा विमानतळांच्या विकास, व्यवस्थापन आणि परिचालनाची पुढील ५० वर्षांसाठी जबाबदारी असेल. विमानतळांच्या संख्येनुसार अदानी समूह देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर बनेल. परंतु प्रवासी संख्येनुसार GMR देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर आहे. त्यांच्याकडे दिल्लीतील IGIA, हैदराबाद आणि गोव्यातील मोपा विमानतळ आहे.
अदानींनी खरेदी केला मुंबई विमानतळातील हिस्सा; पाहा कंपनीकडे आता किती आहेत विमानतळं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 2:58 PM
Adani Group: कंपनीनं खरेदी केला मुंबई विमानतळाचा २३.५ टक्के हिस्सा. यापूर्वी मंगळुरू, लखनौ आणि अहमदाबाद विमानतळांचं केलं होतं अधिग्रहण. जुलैपर्यंत आणखी विमानतळांचं अधिग्रहण होणार.
ठळक मुद्देकंपनीनं खरेदी केला मुंबई विमानतळाचा २३.५ टक्के हिस्सा.यापूर्वी मंगळुरू, लखनौ आणि अहमदाबाद विमानतळांचं केलं होतं अधिग्रहण