नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी अमेरिकेतील व्हिसा(Visa) कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे आता लवकरच तुमच्या हाती अदानी ग्रुपचे क्रेडिट कार्ड येणार आहेत. व्हिसा ही जगातील दुसरी सर्वात मोठी कार्ड पेमेंट कंपनी असून, त्यांनी को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी अदानी समूहाशी हातमिळवणी केली आहे.
अदानी-व्हिसा क्रेडिट कार्ड
ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, व्हिसाचे सीईओ रायन मॅकइनर्नी म्हणाले की, कंपनीने को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी अदानी समूहासोबत करार केला आहे. अदानी समूहासोबतच्या करारामुळे व्हिसाला अदानी समूहाच्या विमानतळ आणि ऑनलाइन सेवांद्वारे 40 कोटी युजर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
व्हिसाचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले
सीईओ रायन यांनी पुढे सांगितले की, अदानी समूहासोबतच को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी ब्रीझ एव्हिएशन ग्रुप आणि एलिजियंट ट्रॅव्हलसोबतही करार करण्यात आला आहे. गेल्या तिमाहीत, ट्रॅव्हल आणि रेस्टॉरंट्समध्ये चांगली मागणी परतल्यामुळे Visa ने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले आकडे नोंदवले. व्हिसाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत व्हिसाचे पेमेंट व्हॉल्यूम 9% वाढून $3.17 ट्रिलियन झाले.
अदानी समूहाचा भर ट्रॅव्हल बुकिंगवर
काही काळापासून ट्रॅव्हल बुकिंग क्षेत्रात अदानी समूहाचा कल वाढला आहे. अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लि.च्या अदानी डिजिटल लॅब्सने ट्रेनमॅन (Trainman) खरेदी करण्यासाठी त्यांच्या मालकीची कंपनी स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड(Stark Enterprises Private Limited) सोबत शेअर खरेदी करार केला आहे. या अंतर्गत अदानी ट्रेनमॅनचे 100% अधिग्रहण करेल.
ट्रेनमॅन हे IRCTC चे अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे, जे स्टार्क एंटरप्रायझेसद्वारे चालवले जाते. या प्लॅटफॉर्मवरुन बुकिंग करण्याव्यतिरिक्त, पीएनआर स्टेटस, कोच स्टेटस, लाईव्ह ट्रेन स्टेटस आणि सीटची उपलब्धता यांसारखी माहिती मिळू शकते.
क्लियरट्रिपसोबतही कारर
या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला क्लिअरट्रिपने अदानी ग्रुपच्या अदानी वनसोबतही हातमिळवणी केली होती. ही डील दोघांसाठी फायदेशीर ठरेल. क्लियरट्रिपला विस्ताराची संधी मिळेल, युजर्स अदानी वन वरुन फ्लाइट बुक करू शकतात, तसेच पार्किंग, रिअल टाइम स्टेटस चेक, कॅब यांसारख्या सुविधाही मिळतील.