अदानी समूह कर्ज फेडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अदानी समूहानं होल्सिम लिमिटेड (Holcim Ltd) कडून त्यांच्या भारतीय कंपन्या विकत घेण्यासाठी जागतिक बँकांकडून 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. या कर्जातील काही भाग अदानी समूहानं फेडला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अदानी समूहानं स्वित्झर्लंडस्थित होल्सिम लिमिटेडचा भारतीय व्यवसाय 10.5 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची घोषणा केली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात अदानी सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेडनं या कर्जापैकी 200 मिलियन डॉलर्स प्री-पेड केले आहेत. हे कर्ज सप्टेंबर 2024 मध्ये मॅच्युअर होणार होते.
अदानी समूहानं होल्सिम लिमिटेडच्या दोन सिमेंट कंपन्या अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी सिमेंट्सचं अधिग्रहण केलं होतं. गौतम अदानी यांनी हे अधिग्रहण ऐतिहासिक असल्याचंही म्हटलेलं. गौतम अदानी म्हणाले होते की होल्सिम अधिग्रहण चार कारणांसाठी ऐतिहासिक आहे. पहिलं म्हणजे यामुळे अदानी समूह भारतातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे देशातील दोन सर्वात प्रतिष्ठित ब्रँड आहेत. तिसरं म्हणजे हे संपादन पायाभूत सुविधांमधील भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा इनबाउंड M&A व्यवहार आहे आणि केवळ चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत झाला आहे आणि चौथं म्हणजे हा व्यवहार अशा वेळी झाला जेव्हा भारताची अर्थव्यवस्था ग्रोथ वाढीपैकी एक होती.
हिंडनबर्ग रिपोर्टनंतर कर्ज फेडलं
24 जानेवारी रोजी यूएस शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स 80 टक्क्यांनी घसरले होते. समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य सुमारे 100 अब्ज डॉलर्सनं घसरलं होतं. या अहवालानंतर अदानी समूहानं काही कर्जाची परतफेड केली आहे. समूहानं शेअर्सवर उभारलेल्या 2 अब्ज डॉलर्सच्या कर्जाचे प्रीपेमेंट केलंय. याशिवाय जीक्युजी पार्टनर्सकडून 1.9 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती.