Join us

Adani वरील कर्ज २१ टक्क्यांनी वाढले; ग्लोबल बँकांकडून घेतलेल्या कर्जाची भर, शेअर्सही गहाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:17 AM

एकीकडे अदानी समूह कर्जफेडीवर भर देत असताना गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बँकांवरील कर्जभार वाढल्याचे सांगितले जात आहे.

Adani Group Debt Burden Increased: हिंडेनबर्ग संस्थेचा रिपोर्ट आल्यापासून अदानी समूहाच्या अडचणी संपताना दिसत नाही. गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी अदानी समूह प्रयत्नशील असताना दिसत आहे. यासाठी काही धोरणे, योजना आखत आहेत. कर्जाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, यातच अदानी समूहावरील कर्जाचा बोजा मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढला आहे. यात आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचे प्रमाण वाढून एक तृतीयांश पातळीवर गेले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, समूहाच्या निव्वळ कर्जाचे कंपन्यांच्या एकत्रित व्याज, कर व घसारापूर्व उत्पन्नाशी गुणोत्तर मागील आर्थिक वर्षांत ३.२ टक्के होते. हे प्रमाण लक्षणीय घसरल्याचे सांगितले जात आहे. अदानी समूहातील प्रमुख सात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्चअखेर वार्षिक तुलनेत २०.७ टक्क्यांनी वाढून २.३ लाख कोटी रुपयांवर (२८ अब्ज डॉलर) पोहोचले आहे. समूहावरील कर्जाचा बोजा २०१९ पासून सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो कमी करण्यासाठी समूहाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. यासंदर्भात ‘ब्लूमबर्ग’ने वृत्त दिले आहे. 

समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमता वाढली

अदानी समूहावरील कर्जामध्ये आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचा वाटा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अदानी समूहाच्या कर्जदात्यांच्या यादीत सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बँका ही वर्गवारीच नव्हती. अदानी समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमताही वाढल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते. अदानी समूहाने मार्च तिमाहीत सुमारे २१ हजार कोटी कर्जाची परतफेड केली आहे. समूहाने तारण ठेवलेले शेअर्स सोडवण्यासोबतच ३ देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्यांचे पैसेही फेडले आहेत. यापूर्वी अदानी समूहाने एवढ्या मोठ्या रकमेच्या कर्जाची परतफेड कोणत्याही तिमाहीत केलेली नव्हती. अदानी समूहाच्या ४ कंपन्यांचे तारण ठेवलेले शेअर्स सोडवण्यासाठी २.५४ अब्ज डॉलर्सची रक्कम फेडली आहे. दानी एंटरप्रायझेसचे तारण ठेवलेले शेअर्स ०.४४ टक्क्यांवर आले. जे यापूर्वी १.९४ टक्के होते. 

दरम्यान, अदानी समूहाने गुजरात राज्यातून आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करीत ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल यासारख्या देशांमध्ये व्यवसाय विस्तार केला. परंतु, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला धक्का बसला आहे. समूहाचे अनेक व्यवसाय आता नियामक यंत्रणांच्या रडारखाली आले आहेत. अदानी समूहाचे वरिष्ठ अधिकारी गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करीत आहेत. समूह कर्जाची परतफेड करीत असल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :अदानीगौतम अदानी