Adani Group Loan Repayment:अदानी समूहाच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसत आहे. हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाचे प्रचंड नुकसान झाले. अदानी समूह अद्यापही त्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. कंपन्यांचे वाढत असलेले शेअर्स पुन्हा लोअर सर्किटला लागत आहेत. कर्जफेड करण्यासाठी अदानी समूहाने कैक अब्ज डॉलरचे शेअर गहाण ठेवले आहेत. मात्र, तरीही समूहाला त्यांच्यावरील संपूर्ण कर्जाची परतफेड करता आली नसल्याचे सांगितले जात आहे.
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने शेअर्स गहाण ठेवून मिळवलेल्या रकमेतून २.१५ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड केल्याचे सांगितले जात आहे. आता फक्त कंपनीकडे ऑपरेटिंग स्तरावरचे कर्ज शिल्लक असल्याचीही माहिती आहे. अदानी समूहाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात कंपनी कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असल्याचे आश्वासन गुंतवणूकदारांना देण्यात आले आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, अदानी समूहाने बँकांकडे शेअर्स गहाण ठेवून घेतलेले संपूर्ण कर्ज फेडलेले नाही. मात्र, कर्जफेड न झाल्याचा अहवालच अदानी समूहाने फेटाळून लावला आहे.
अदानी समूहाने सर्व दावे फेटाळून लावले
२.१५ अब्ज डॉलर कर्ज न भरल्याचा अहवाल अदानी समूहाने फेटाळून लावला आहे. सदर अहवाल तथ्यहीन आणि बनावट असल्याचा पलटवार अदानी समूहाने केला आहे. अदानी समूहाने म्हटले आहे की, ऑपरेटिंग कंपनी सुविधांच्या कर्जासाठी तारण ठेवलेले शेअर्सच आता फक्त बाकी आहेत. ६ फेब्रुवारीपासून तारण ठेवलेल्या शेअर्सची पूर्तता सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून, पहिल्या टप्प्यात १.११४ अब्ज डॉलर किमतीचे तारण ठेवलेले शेअर्स, दुसऱ्या टप्प्यात १३४ दशलक्ष आणि तिसऱ्या मार्चमध्ये ९०२ दशलक्ष शेअर्स परत मिळवण्यात यश आले आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. अदानी ग्रीन, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स तारण ठेवण्यात आले होते.
दरम्यान, हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे मूल्य १३५ अब्ज डॉलरने कमी झाले. अदानी समूहाने हिंडेनबर्गचा अहवाल फेटाळून लावला होता. अदानी समूहाला हानी पोहोचवण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला असून, तो पूर्णपणे निराधार असल्याचे अदाणी समूहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"