नवी दिल्ली : मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलेले असतानाच अदानी उद्योग समूहाने कृषी बाजारावर वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरूवात केली आहे.
तिन्ही कृषी कायदे रिलायन्स आणि अदानी उद्योग समूहांच्या हितासाठी आणण्यात आले असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून सुरूवातीपासून करण्यात येत आहे. दोन्ही उद्योग समूहाने हा आरोप फेटाळून लावला असला तरी समोर येत असलेली माहिती धक्कादायक आहे. अदानी समूहाने दिलेल्या स्पष्टिकरणातच कृषी उत्पन्नाची साठवणूक, वाहतूक आणि बाजार या क्षेत्रातील त्यांचे पाय कसे मजबूत झाले आहेत, हे दिसून येत आहे. आपण २००५ पासून भारतीय अन्न महामंडळासाठी गोदामांची उभारणी आणि देखभाल ही कामे करतो. तथापि, कृषी उत्पादनांच्या दरांशी आमचा कोणताही संबंध नाही, असे अदानी समूहाने म्हटले आहे. मात्र अदानी समूहाकडे अन्नधान्याची साठवणूक आणि वाहतुक याची प्रचंड मोठी व्यवस्था असल्याचे कंपनीने कोरोना साथीच्या काळात जारी केलेल्या एका निवेदनातून समोर आले आहे. अदानी ॲग्री लॉजिस्टिक्स लि.ने लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ३० हजार टन अन्नधान्य पुरविले.
गहू, डाळी आणि साखरेचाही व्यवसाय
अदानी विल्मर तांदूळ, गहू, डाळी आणि साखर या पिकांशी संबंधित व्यवसाय करते. मोदी सरकारने २०१६ मध्येच कंपनीला चीनला तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली होती. काही हजार टनांचा हा निर्यात व्यवसाय आता ४ दशलक्ष टनांवर जाणार आहे. चीनने दक्षिण आशियाई देशांऐवजी भारतातूनच सर्वाधिक तांदूळ आयात करण्याचा विचार आता चालविला आहे.
अदानी विल्मर २०१४ पासून ब्रँडेड बासमती तांदूळ विकते. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून कंपनी तांदूळ खरेदी करते. यंदा मात्र कंपनीने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या तांदळाचा भाव ६०० रुपयांनी कमी केला. हाच तांदूळ ग्राहकांना विकताना मात्र भावात कपात केली नाही.