आशियातील दोन सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी 'नो पोचिंग' करारावर स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत अदानी समूहाचे कर्मचारी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकणार नाहीत किंवा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अदानी समूह कामावर घेणार नाही. हा करार या वर्षी मे महिन्यापासून लागू झाला असून दोन्ही कंपन्यांशी संबंधित सर्व व्यवसायांसाठी आहे.
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, या कराराशी संबंधित प्रश्नांची उत्तरे अद्याप अदानी समूह किंवा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देण्यात आलेली नाहीत. 'नो पोचिंग' कराराला महत्त्व आहे कारण अदानी समूह आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे वर्चस्व असलेल्या व्यवसायात प्रवेश करण्याच्या आहे. गेल्या वर्षी, अदानी समूहाने अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड सोबत पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली. या क्षेत्रात रिलायन्सची सर्वात मोठी उपस्थिती आहे.
टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्रीत्याचवेळी अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी पहिले पाऊल टाकले आहे. अलीकडेच अदानी समूहाने 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली. त्याचबरोबर हरित ऊर्जा क्षेत्रात अदानी आणि अंबानी एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनताना दिसत आहेत. तसेच मीडिया क्षेत्रातही मुकेश अंबानी यांच्यानंतर आता अदानी समूहाने प्रवेश केला आहे.
किती कर्मचाऱ्यांवर परिणाम?
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील करारामुळे लाखो कर्मचाऱ्यांसाठी आता मार्ग बंद झाला आहे. रिलायन्समध्ये 3.80 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर अदानी समूहाचे हजारो कर्मचारी मुकेश अंबानींच्या कोणत्याही कंपनीत काम करू शकणार नाहीत.
… म्हणून कंपन्या आग्रही'नो पोचिंग' कराराची प्रथा भारतात प्रचलित नसली तरी आता ती मोठ्या प्रमाणात रूढ होत आहे. टॅलेंट वॉर आणि पगारवाढ यामुळे कंपन्या 'नो पोचिंग' करारासाठी आग्रही आहेत. कर्मचाऱ्यांची मागणी किंवा वाढते पगार ज्या क्षेत्रात टॅलेंट कमी आहे त्या कंपन्यांसाठी विशेष करून धोक्याचे आहे.