adani group : कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना उद्योगपती गौतम अदानी यांनी अल्पावधीत मिळवलेलं यश खूप मोठं आहे. गौमत अदानी यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं तिथं आपला दबदबा निर्माण केला आहे. अदानी यांनी एखादा प्रकल्प हाती घेतला आणि नंतर मागे हटले हे दुर्मिळ आहे. पण, हे पहिल्यांदाच होणार आहे. भारतातील आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीने दूरसंचार क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी ग्रुपने २०२२ मध्ये खरेदी केलेले स्पेक्ट्रम भारती एअरटेलला विकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने टेलिकॉम क्षेत्रातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अदानी डेटा नेटवर्क्सने २६GHz बँडमध्ये ४०० MHz स्पेक्ट्रम सुमारे २१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता हे स्पेक्ट्रम एअरटेलला विकले जातील. अदानी ग्रुपने यापूर्वी सांगितले होते, की ते या स्पेक्ट्रमचा वापर त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी करतील. परंतु, दूरसंचार विभागाच्या (DoT) नियमांनुसार, स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या कंपन्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. असे न केल्यास दंड होऊ शकतो.
एअरटेल कंपनीने काय सांगितलं?
सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वाखालील एअरटेलने सांगितले की, भारती एअरटेल आणि त्यांची उपकंपनी भारती हेक्साकॉम यांनी अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या अदानी डेटा नेटवर्क्ससोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत, एअरटेलला गुजरात (१०० मेगाहर्ट्झ), मुंबई (१०० मेगाहर्ट्झ), आंध्र प्रदेश (५० मेगाहर्ट्झ), राजस्थान (५० मेगाहर्ट्झ), कर्नाटक (५० मेगाहर्ट्झ) आणि तामिळनाडू (५० मेगाहर्ट्झ) मध्ये २६ गीगाहर्ट्झ बँडचा ४०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम वापरण्याचा अधिकार मिळेल. कंपनीने असेही म्हटले आहे की हा करार काही अटी आणि सरकारी मंजुरींच्या अधीन राहून पूर्ण केला जाईल.
अदानींनी माघार का घेतली?
२०२२ मध्ये अदानी ग्रुपने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. असे मानले जाते की अदानी ग्रुप व्होडाफोन आयडियासारख्या अडचणीत सापडलेल्या कंपन्यांना खरेदी करू शकतो. अदानी समूहाने विमानतळ, सिमेंट, डेटा सेंटर, वीज आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये आक्रमकपणे आघाडी घेतली आहे. त्यामुळे, ते टेलिकॉम आणि डिजिटल क्षेत्रातही रिलायन्स जिओसारखा धमाका करतील असे मानले जात होते. पण, अदानी ग्रुपने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं, की त्यांना स्पेक्ट्रम फक्त त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरायचा आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायाला पाठिंबा देण्यासाठी विमानतळांपासून वीज आणि डेटा सेंटरपर्यंतचे खाजगी नेटवर्क तयार करायचे आहे.
वाचा - ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अदानी समूहाचे लक्ष इतर मोठ्या गुंतवणूक क्षेत्रांवर आहे. म्हणूनच, त्यांनी दूरसंचार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा. एका आतल्या सूत्राने सांगितले की, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि तीव्र स्पर्धेमुळे समूहाने व्यवसायापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा. कारण, दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी खूप पैसे लागतात आणि तिथे खूप स्पर्धा आहे.