Join us

संघर्ष तीव्र होणार! NDTV अधिग्रहणासाठी सेबी मान्यतेची गरज नाही; Adaniचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 12:42 PM

एनडीटीव्हीने उपस्थित केलेले दावे निराधार, कायदेशीरदृष्ट्या न टिकणारे आहेत, असे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली:अदानी समुहाची कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने (AMNL) इनडायरेक्ट पद्धतीने एनडीटीव्हीमध्ये २९.१८ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूह एनटीव्हीमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर सादर करणार आहे. मात्र, याला एनडीटीव्हीने तीव्र आक्षेप घेतला असून, यासाठी सेबीची मान्यता लागणार असल्याचा दावा केला आहे. एनडीटीव्हीचा हा दावा अदानी समूहाने फेटाळला असून, सेबीच्या मान्यतेची गरज नसल्याचे म्हटले आहे. यावरून आता अदानी समूह आणि एनडीटीव्हीमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांना भांडवली बाजारामध्ये व्यवहार करण्यापासून रोखणाऱ्या नियामकाच्या आदेशाचा आणि अधिग्रहण व्यवहाराचा कसलाही संबंध नसल्याचेही स्पष्टीकरण दिले. एनडीटीव्हीद्वारे उपस्थित केले गेलेले दावे निराधार, कायदेशीरदृष्ट्या न टिकणारे आहेत. विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडला (व्हीसीपीएल) कर्जाच्या बदल्यात दिलेल्या परिवर्तनीय रोख्यांना समभागांत रूपांतरित करण्यास, एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी आरआरपीएल बांधील आहे, असा दावा अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात केला आहे. 

तरतुदींचे पालन करण्यास आरआरपीआर कायद्याने बांधील

अदानी समूहाची घटक बनलेल्या व्हीसीपीएलबरोबर केलेल्या करारातील तरतुदींचे पालन करण्यास आरआरपीआर कायद्याने बांधील आहे, असेही अदानी एंटरप्रायझेसने म्हटले आहे. त्यांचे पालन केल्याने ‘सेबी’च्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन होत नाही, कारण प्रणॉय रॉय किंवा राधिका रॉय यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही व्यवहार होत नाही, असे समूहाने निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या घडामोडींच्या परिणामी एनडीटीव्हीचा समभाग सलग तिसऱ्या सत्रात वरच्या सर्किट मर्यादेपर्यंत पोहोचला आणि मुंबई शेअर बाजारात ४२७.७० रुपये असा वर्षांतील उच्चांकी स्तरावर पोहोचला. 

टॅग्स :अदानीशेअर बाजार