नवी दिल्ली: देशातील 5 विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाला देण्यात आली आहे. अदानी समूहानं 6 विमानतळांसाठी बोली लावली होती. त्यापैकी 5 बोलींमध्ये त्यांना यश आलं. तर एका विमानतळाचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. अदानी समूहानं विमान उड्डाण क्षेत्रात दमदार प्रवेश करत 5 विमानतळांचं 50 वर्षांसाठीचं कंत्राट मिळवलं. यामध्ये लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरु आणि त्रिवेंद्रमचा समावेश आहे. याशिवाय समूहानं गुवाहाटी विमानतळासाठीही बोली लावली आहे.
देशातील 5 मोठ्या विमानतळांच्या देखभाल, दुरुस्ती आणि अत्याधुनिकीकरणाचं कंत्राट पुढील 50 वर्षांसाठी अदानी समूहाकडे असेल. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं (एएआय) याबद्दलची माहिती दिली. 'मासिक प्रवासी शुल्क' या तत्त्वाच्या निकषावर अदानी समूहाला कंत्राट देण्यात आलं. 'विमानतळांच्या लिलाव प्रक्रियेत इतर कंपन्यांपेक्षा अदानी समूहानं अतिशय आक्रमकपणे बोली लावल्या. आता औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडे 5 विमानतळांची जबाबदारी सोपवण्यात येईल', असं एएआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
एएआयकडे असणाऱ्या 6 विमानतळांची जबाबदारी सार्वजनिक-खासगी भागिदारीच्या (पीपीपी) अंतर्गत देण्याबद्दलच्या प्रस्तावाला गेल्या नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारनं मंजुरी दिली. या सहा विमानतळांसाठी 10 कंपन्यांनी 32 तांत्रिक बोली लावल्या. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासांठी प्रत्येकी 7-7 बोली लावल्या गेल्या. तर लखनऊ आणि गुवाहाटी विमानतळांसाठी प्रत्येकी 6-6, मंगळुरु आणि त्रिवेंद्रम विमानतळांसाठी प्रत्येकी 3-3 बोली लावण्यात आल्या. यापैकी गुवाहाटीचं कंत्राट कोणाला मिळणार, याचा निर्णय उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
अदानी समूहाला अच्छे दिन; 50 वर्षांसाठी देशातील 5 मोठ्या विमानतळांचं कंत्राट
हवाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाचा प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 06:47 PM2019-02-25T18:47:41+5:302019-02-25T18:49:22+5:30