Join us

Adani Group: अदानी समूहाने SBI म्युचुअल फंडाचे १५०० कोटींचे कर्ज फेडले; ५ हजार कोटींचे कर्जही परत करणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 9:45 PM

Adani Group: हिंडेनबर्गच्या अहवालानंतर प्रचंड मोठे नुकसान होत असलेल्या अदानी समूहाने कर्जफेडीची योजना हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.

Adani Group: अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समूहासंदर्भात अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. यातून अद्यापही अदानी समूह सावरलेला नाही. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सची पडझड मोठ्या प्रमाणावर सुरू असून, गौतम अदानी हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आणखी खाली जात आहेत. यातच अदानी समूहाने SBI म्युचुअल फंडाचे १५०० कोटींचे कर्ज फेडले असून, आगामी काळात आणखी मोठी कर्जे फेडणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहातील एका कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने एसबीआय म्युच्युअल फंडांची १,५०० कोटी रुपयांची थकबाकी फेडली आहे. मार्चमध्ये सदर कंपनी १ हजार कोटी रुपयांचे थकित कर्जही भरणार असल्याचे प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे. अलीकडेच अदानी समूहाने प्रवर्तकांकडून विविध कंपन्यांसाठी घेतलेले शेअर्सचे कर्ज मुदतीपूर्वी फेडण्यासाठी १११ कोटी डॉलरचा भरणा केला होता. 

हा भाग प्रीपेमेंट विद्यमान रोख शिल्लक आणि व्यवसाय ऑपरेशन्समधील निधीतून आहे. हे पेआउट बाजाराने समूहाच्या भांडवल आणि व्यवस्थापन योजनेवर ठेवलेला विश्वास दर्शवितो, असे प्रवक्त्यांनी सांगितले. अदानी समूहाने गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि सद्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्या धोरणानुसार, डीबी पॉवरचा ७ हजार कोटींचा कोळसा प्लांटचे अधिग्रहण करण्याची योजना अदानी समूहाने रद्द केली आहे. विद्यमान कर्जाच्या परतफेडीचा रोडमॅप अदानी समूहाने तयार केल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, यापूर्वी अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने ८ फेब्रुवारी रोजी सांगितले होते की, एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करेल. तसेच, समूह पुढील महिन्यात ५०० मिलियन डॉलरच्या कर्जाचीही परतफेड करेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अदानीगौतम अदानी