Join us

Gautam Adani News : वाढदिवशी गौतम अदानींचं हिंडेनबर्गला 'रिटर्न गिफ्ट'; आरोपांमागचं षडयंत्र उघड केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 2:01 PM

Gautam Adani News : आज गौतम अदानी यांच्या ६२ वा वाढदिवस असून याच दिवशी अदानी समूहाची ३२ वी एजीएमदेखील पार पडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हिंडेनबर्गवर जोरदार निशाणा शाधला.

Gautam Adani News : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत गौतम अदानी (Adani Group) यांचा आज वाढदिवस असून ते ६२ वर्षांचे झाले आहेत. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी (Gautam Adani Birthday) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Adani AGM 2024) बोलताना त्यांनी अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गवर निशाणा साधला. हिंडेनबर्गचा रिपोर्ट केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आला होता असं अदानी म्हणाले. 

अदानी समूहाच्या (Adani Group) ३२ व्या एजीएममध्ये अदानींनी सोमवारी हिंडेनबर्गवर जोरदार निशाणा साधला. "आम्हाला बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. यासाठीच हिंडेनबर्गची निर्मिती करण्यात आलेली. परंतु यातून अदानी समूह वाचलाच नाही, तर आणखी मजबूतीनं समोर आला. कोणताही अडथळा अदानी समूहाला कमकूवत करू शकत नाही याचा हा भक्कम पुरावा आहे," असं गौतम अदानींनी स्पष्ट केलं.

गौतम अदानी यांनी हिंडेनबर्गची घटना म्हणजे अदानी समूहावरील दुटप्पी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. ज्याअंतर्गत आमच्या आर्थिक स्थितीवर अस्पष्ट टीका झाली, ज्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. "आमचा समूह आपले काम पारदर्शकपणे करत आहे आणि सर्व रेटिंग एजन्सींनी त्याला मान्यताही दिली आहे. हिंडेनबर्गच्या बेअरिंग ग्रुपमधील बहुतांश कंपन्या बाहेर आल्या आहेत आणि पुन्हा विक्रमी व्यवसाय करत आहेत," असंही अदानी म्हणाले.

अदानी समूहावर केलेले आरोप

गौतम अदानी समूहासाठी २०२३ वर्ष वाईट ठरलं होतं. २०२३ च्या सुरुवातीला २४ जानेवारी रोजी नॅथन अँडरसन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गनं अदानी समूहाविषयी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. यात अदानी समूहावर मनी लॉन्ड्रिंग आणि शेअरमध्ये हेराफेरीचा आरोप केला होता. यामध्ये ८८ सवाल करण्यात आले होते. तसंच समूहाच्या ७ प्रमुख लिस्टेड कंपन्या ८५ टक्क्यांपेक्षा अधिक ओव्हरव्हॅल्यू असल्याचा आरोपही त्यात करण्यात आलेला. इतकंच नाही तर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या कर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.

यानंतर अदानी समूहानं त्वरित यावर प्रतिक्रिया देत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. परंतु यानंतरही कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती आणि अदानींच्या नेटवर्थमध्येही घट झाली. अदानी समूहाचं बाजारमूल्य १५० अब्ज डॉलर्सपर्यंत घसरलं होतं.

टॅग्स :गौतम अदानीअदानी