गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होताना दिसतेय. याचाच फायदा गौतम अदानी यांनाही होतोय. वर्ष बदललं तसं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचं नशीबही बदलल्याचं दिसतंय. वर्षाच्या पहिल्या चार दिवसांत त्यांची एकूण संपत्ती १३.३ अब्ज डॉलर्स म्हणजेच ११,०७,४२,८४,९०,००० रुपयांनी वाढली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा तेजीनं वर आलेत. गुरुवारी, त्यांची एकूण संपत्ती ७.६७ अब्ज डॉलर्सनं वाढली आणि ९७.६ अब्ज डॉलर्स इतकी झाली.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते १२ व्या क्रमांकावर आले आहेत. यासह अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं स्थान पटकावलं आहे. ९७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अंबानी आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या आणि जागतिक यादीत १३व्या स्थानावर घसरले आहेत. गेल्या वर्षी अदानींच्या नेट वर्थमध्ये मोठी घसरण झाली होती, परंतु नवीन वर्षात त्यांनी जोरदार पुनरागमन केलंय.
अंबानी-अदानींसाठी चांगली सुरुवात
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार जगातील अब्जाधीशांसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली झालेली नाही. जगातील टॉप २० अब्जाधीशांपैकी फक्त तीन जणांची संपत्ती वाढली आहे. यामध्ये अदानी आणि त्यांच्याशिवाय अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचाही समावेश आहे. गुरुवारी अंबानींच्या संपत्तीत ७६.४ कोटी डॉलर्सची वाढ झाली. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ६६.५ कोटी डॉलर्सनं वाढली आहे.
त्याचबरोबर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या क्रमांकावर असलेल्या बफे यांच्या संपत्तीत यावर्षी १.९२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांची या वर्षात सर्वाधिक संपत्ती कमी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत १०.८ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे आणि ते श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरले आहे.
टॉप १० मध्ये कोण?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी ९.३५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 220 अब्ज डॉलर्स आहे. अमेझॉनचे जेफ बेझोस (१६९ अब्ज डॉलर्स) सह दुसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स (१३८ अब्ज डॉलर्स) चौथ्या, स्टीव्ह बाल्मर (१२८ अब्ज डॉलर्स) पाचव्या, मार्क झुकेरबर्ग (१२६ अब्ज डॉलर्स) सहाव्या, लॅरी पेज (१२४ अब्ज डॉलर्स) सातव्या, बफे (१२२ अब्ज डॉलर्स) आठव्या, लॅरी एलिसन (१२० अब्ज डॉलर्स) नवव्या स्थानावर आणि सर्गेई ब्रिन (११७ अब्ज डॉलर्स) दहाव्या स्थानावर आहेत. जगातील टॉप १० श्रीमंतांपैकी नऊ जण अमेरिकेतील आहेत.