Join us

...तर ‘जीव्हीके’ बाहेर; अदानी समूह मिळवणार मुंबई विमानतळात सर्वाधिक भागभांडवल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 3:10 AM

मुंबई विमानतळ, देशातील सर्वात व्यस्त आणि सर्वाधिक पैसा कमावणारे एक ठिकाण असून, गेल्या एका वर्षापासून ते अदानीच्या रडारवर आहे.

मुंबई : मुंबईविमानतळाचे नियंत्रण मिळविण्याचा वाद सोडविण्याच्या दिशेने वाटचाल करताना अदानी समूह सर्वाधिक ५१ टक्के भागभांडवल मिळवेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. जीव्हीके समूहासोबत सुरू असलेला वाद संपविण्यासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून त्यातून हे संकेत मिळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अदानी समूहाने याआधी दोन दक्षिण आफ्रिकन कंपन्यांचे भागभांडवल खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जीव्हीकेसोबत प्रस्ताव प्रत्यक्षात उतरल्यास या दोन कंपन्यांसोबतच्या वाटाघाटी मागे पडतील. विमानतळ प्राधिकरणाकडे (एएआय) उर्वरित २६ टक्के भागभांडवल असून अदानी समूहाकडून अद्याप औपचारिक प्रस्ताव मिळाला नसल्याचे या कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबई विमानतळ, देशातील सर्वात व्यस्त आणि सर्वाधिक पैसा कमावणारे एक ठिकाण असून, गेल्या एका वर्षापासून ते अदानीच्या रडारवर आहे. मार्च २०१९ मध्ये अदानी यांनी बिडवेस्टची १३.५ टक्के हिस्सा १२४८ कोटी रुपयांत विकत घेण्याची ऑफर दिली होती; पण जीव्हीकेने ‘नकाराचा पहिला हक्क’ आपला असल्याचा दावा करून ही ऑफर रोखली होती. बिडवेस्टने समान किमतीची ऑफर जीव्हीकेला दिली. यामुळे जीव्हीके समूहाचा हिस्सा ५०.५ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांपर्यंत वाढला असता. त्यानंतर अदानी यांनी जीव्हीकेच्या प्रस्तावाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने जीव्हीकेला नोव्हेंबरपर्यंत बिडवेस्टसोबतचा करार पूर्ण करावा, असे सांगितले होते....तर ‘जीव्हीके’ बाहेरतिढा सुटल्यास जीव्हीके समूह या प्रतिष्ठित विमानतळावर नियंत्रण मिळविण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडू शकते. सध्या जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंगकडे ५०.५ टक्के भागभांडवल आहे. बिडवेस्ट या दक्षिण आफ्रिकन कंपनीकडे १३.५ टक्के तर दक्षिण आफ्रिकेच्याच एसीएसए या कंपनीकडे १० टक्के भागभांडवल आहे.

टॅग्स :मुंबईविमानतळ