Join us  

हिंडेनबर्ग रिपोर्टने एलआयसीचे पैसे बुडाले! म्युच्युअल फंड आणि FII चेही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 3:55 PM

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचा आरोप केला आहे, या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचा आरोप केला आहे, या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. अदानी समुहात देशातील सर्वात मोठी असलेल्या एलआयसीची मोठी गुंतवणूक आहे. पण, समभाग घसरल्याने त्यांना 38,509 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये आहे. गेल्या सात सत्रांमध्ये एलआयसीचे गुंतवणूक मूल्य 38,509 कोटी रुपयांनी घसरून 42,759 कोटी रुपये झाले आहे. 24 जानेवारी रोजी अदानी टोटल गॅसमधील एलआयसीच्या स्टेकचे मूल्य 25,484 कोटी रुपये होते, ते आता 10,664 कोटी रुपयांवर आले आहे.

अदानी पोर्ट्समध्ये ते 15,029 कोटी रुपयांवरून 9,854 कोटी रुपयांवर आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये ते 16,585 कोटी रुपयांवरून 7,632 कोटी रुपयांवर आले आहे. 24 जानेवारी रोजी अदानी ट्रान्समिशनमध्ये एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य 5,701 कोटी रुपयांवर आले आहे. त्याचप्रमाणे अंबुजा सिमेंट्स, एसीसी आणि अदानी ग्रीन एनर्जीमधील एलआयसीच्या गुंतवणुकीलाही फटका बसला आहे.

जनतेचा पैसा एलआयसीने कुठे कुठे गुंतविला? जाणून घ्या

एलआयसी, म्युच्युअल फंड आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदार यांनी सात दिवसांत अदानी समूहाच्या समभागांमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान केले आहे. 24 जानेवारीपर्यंत त्यांची अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक 3,98,563 कोटी रुपयांची होती, जी आता 1,90,782 कोटी रुपयांवर आली आहे. सात दिवसांत ती 2,07,781 कोटी रुपयांनी म्हणजेच 52 टक्क्यांनी घसरली आहे. म्युच्युअल फंड अदानी समूहाच्या दहा सूचीबद्ध कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांमध्ये हिस्सेदारी ठेवतात, तर FII कडे सर्व दहा कंपन्यांमध्ये भागभांडवल आहे.

 मॅच्युअल फंडांच्या गुंतवणुकीचे मूल्य 8,282 कोटी रुपयांनी घसरून 16,280 कोटी रुपयांवर आले आहे. अंबुजा सिमेंट्स, अदानी पोर्ट्स, एसीसी आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये त्यांची होल्डिंग आहेत. म्युच्युअल फंडांनी गेल्या चार तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समधील त्यांचे स्टेक कमी केले आहेत. अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीमुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे 1,43,991 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 148,742 कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या चार तिमाहीत, FII ने अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनमधील त्यांचे होल्डिंग कमी केले.

टॅग्स :गौतम अदानीएलआयसीव्यवसाय