गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर रॉकेट स्पीडने वाढताना दिसत आहेत. अनेक कंपन्यांच्या शेअरना अप्पर सर्किट लागल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालातही प्रथमदर्शनी अदानी समूहात कोणतेही गैरव्यवहार दिसून आले नाहीत. या प्रकरणी आता पुढील तपास सेबी करणार आहे. यातच एका माणसाचे नशीब जोरदार फळफळले आहे. अदानी समूहाच्या पडत्या काळात कंपनीची मदत करणाऱ्या व्यक्तीने १०१ दिवसांत तब्बल ८ हजार ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राजीव जैन यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं अदानी समुहाला दिलेल्या क्लीन चिटवर राजीव जैन यांनी आपलं मत व्यक्त केलं. “मला याचं आश्चर्य वाटलं नाही. अशा अनेक बाबींचा तपास यापूर्वीही सुरू होता. हा आर्थिक मुद्द्यापेक्षा राजकीय खेळ बनला आहे. सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चिट देण्यापूर्वी अदानी समूहातील हिस्सेदारी वाढवण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत त्यांनी ही हिस्सेदारी वाढवण्यात आली,” असं जैन म्हणाले. एनडीटीव्ही बीक्युजी प्राईमला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. ज्या उद्योजकांनी प्रकल्प राबविण्यासाठी उत्तम काम केलंय त्यांना आपण पाठिंबा दिलाय. भारतात जटिल पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभे करणे खूप कठीण आहे. गेल्या काही वर्षांत त्यात अपयश आल्याचं दिसून आलंय, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
हिंडेनबर्गमध्ये निरर्थक गोष्टी
अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या आघाडीवर उत्कृष्ट काम केलंय. गेल्या काही वर्षांत त्यांच्या मॅनेजमेंट टीमलाही भेट दिली आहे आणि ते प्रभावित करणारे आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारलाही अदानींवर विश्वास आहे. जो योग्यरित्याच काम करतो त्यांच्यावरच असा भरवसा निर्माण होऊ शकतो असं जैन म्हणाले.
हिंडेनबर्ग रिपोर्टमधील अनेक गोष्टी निरर्थक वाटल्या. गुंतवणूकदार काय प्रतिक्रिया देतील याबद्दल बरीच भीती होती. पहिल्या तिमाहीतील निकाल आमच्या इतिहासातील सर्वोत्तम आहेत आणि यासह इनफ्लोच्या बाबतीत ही तिसरी सर्वोत्तम तिमाही राहिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
भारताबाबत मत काय?
भारतात अशा काही कंपन्या आहेत ज्यांचं मूल्यांकन खूपच कमी आहे. परंतु असे व्यवसाय ज्यांची वाढ चांगली आहे, त्यांचं मूल्यांकन जास्त आहे. इन्फोसिस अशीच आहे. भारता अतिशय मजबूतीनं पुढे जात आहे. परंतु भारताला अजूनही कमी प्रोत्साहन दिलं जात असल्याचं जैन यांनी स्पष्ट केलं.