Join us

Adani Group : जपानी बँकांनी ठेवला विश्वास! अदानी ग्रुपला मदत करणार, अडकलेले प्रकल्प पुन्हा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 7:26 PM

जपानमधील तीन बँकांनी अदानी समुहात गुंतवणुकीचं आश्वासन दिलंय.

गौतम अदानी यांच्या अदानी समूहासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. जपानमधील तीन बँकांनी अदानी समुहात गुंतवणुकीचं आश्वासन दिलंय. ज्यामध्ये मित्सुबिशी युएफजे फायनान्शियल ग्रुप, सुमितोमो मित्सुई बँकिंग आणि मिझुहो फायनान्शियल ग्रुपचा समावेश आहे. या तिन्ही बँका सध्या अदानी समूहाच्या कर्जदार नाहीत. तिन्ही बँकांकडून मिळणाऱ्या निधीमुळे हाय कॉस्ट लोनला रिफायनॅन्स करण्यास मदत मिळेल. तसंच थांबलेल्या किंवा धीम्या गतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, अदानी समूहाचे अर्ध्याहून अधिक मार्केट कॅप घसरलं आहे. त्यानंतर गौतम अदानी यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी आशिया आणि युरोपमध्ये रोड शो केले आणि त्यात गौतम अदानी यांना यश मिळाले. याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता.

स्टँडर्ड चार्टर्ड आणि बार्कलेजसह विद्यमान कर्जदारांनी देखील समूहावर विश्वास ठेवल्याचं एफईच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात आलंय. दुसरीकडे, सर्व बँकांनी आर्थिक वर्ष २०२४ आणि आर्थिक वर्ष २०२६ दरम्यान विद्यमान आणि नवीन कर्जाच्या रिफायनॅन्ससाठी समर्थन दिलं आहे. अदानी समूहाकडे आर्थिक वर्ष २०२४ आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये मॅच्युअर होणारे ४ बिलियन डॉलर्सचे बॉन्ड्स आहेत. दुसरीकडे, जीक्युजी भागीदार देखील अदानी समूहात अधिक गुंतवणूक करू शकतात. हे तेच अमेरिकन गुंतवणूकदार आहेत ज्यांनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि अदानी टोटल गॅसमध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

कोणत्या व्यवसायांवर नजर?

अदानी समूहाच्या कंपन्या इन्फ्रा आणि युटिलिटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवण्यात गुंतलेल्या आहेत आणि या प्रकल्पांसाठी रोख प्रवाह आवश्यक आहे. त्याच वेळी, न्यू एनर्जी ग्रीन एनर्जी प्रकल्पांसाठी सुमारे ८०० मिलियन डॉलर्स उभारण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या सिमेंट व्यवसायात क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे. रोड शो दरम्यान, समूहानं गुंतवणूकदारांना माहिती दिली की कंपनी आपले इन्फ्रा, सिमेंट आणि एफएमजीसी व्यवसाय वाढविण्याचा विचार करत आहे.

आकडेवारीनुसार, मार्च २०२३ पर्यंत अदानी समूहावर २.२७ ट्रिलियन रुपयांचं कर्ज आहे. त्यापैकी ३९ टक्के बाँड्सच्या स्वरूपात आहेत. एकूण कर्जापैकी २९ टक्के कर्ज हे आंतरराष्ट्रीय बँकांकडून घेतलेलं आहे.

टॅग्स :अदानीगौतम अदानीजपान