Join us

Adani Group ला नवीन प्रोजेक्टसाठी हवेत पैसे; मुंबईतील रिअल इस्टेट मालमत्ता विकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 2:59 PM

Adani Group Property Sale: अदानी समूह आपल्या मालमत्ता विकून पैसे उभारणार असल्याचे सांगितले जात आहे.

Adani Group Property Sale: २०२३ ची सुरुवात अदानी समूहासाठी चांगली ठरली नाही. अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहावर एकामागून एक संकटे येत गेली. मात्र, यावर मात करत आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करत अदानी समूह हळूहळू यातून सावरत आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स पुन्हा वधारल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, अदानी समूहाने आपल्या मुंबईतील काही मालमत्ता विकायचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. हा एक व्यावसायिक रणनीतिचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  अदानी समूह महत्त्वाच्या नसलेल्या रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याचा विचार करत आहे. या मालमत्ता विक्रीतून येणारा पैसा समूह त्याच्या नवीन रिअल इस्टेट उपक्रमांसाठी वापरणार आहे, असा सांगितले जात आहे. विक्रीसाठी असलेल्या मालमत्तांपैकी एक म्हणजे Inspire BKC, मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेला हा एक व्यावसायिक रिअल इस्टेट प्रकल्प आहे. मुंबईजवळील ठाण्यातील एसीसीच्या मालकीच्या सुमारे १६ कर जमिनीचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. 

या मालमत्तांची अंदाजे किंमत ६५० कोटी रुपये आहे

अदानी समूहाच्या या मालमत्तांची अंदाजे किंमत ६५० कोटी रुपये  आहे. अदानी समूहाने देशभरातील अत्यंत मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये व्यावसायिक आणि रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करण्यासाठी झपाट्याने पाऊले उचलली आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. दुसरीकडे, अदानी समूहाने अंदाजे ५ हजार ०६९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला आहे. 

दरम्यान, गौतम अदानी समूहाचे दोन शेअर्स नुकतेच एमएससीआय ग्लोबल इंडेक्समधून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्यांचे बाजार मूल्य १० अब्ज डॉलरनी घसरल्याचे सांगितले जात आहे. एमएससीआय इंकने अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला निर्देशांकातून बाहेर काढले होते. त्याचा परिणाम अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सवर दिसून आला आहे.

 

टॅग्स :अदानीगौतम अदानी