अदानी समुहाच्या १० लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. यामुळे अदानी समुहाच्या मार्केट कॅपमध्ये २५,००० कोटी रुपयांची घसरण झाली. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील या समूहाच्या अदानी पोर्ट्स अँड सेझ या कंपनीने डेलॉइट हॅस्किन्स अँड सेल्सच्या राजीनाम्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. यामुळे, अदानींची एकूण संपत्ती देखील १.६३ अब्ज डॉलरने घसरली आणि ५८.२ अब्ज डॉलर आहे. यासह अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २२ व्या क्रमांकावर घसरले आहे. ट्रेडींगवेळी अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग ५.४ टक्क्यांनी घसरले. शेवटी ३.३ टक्क्यांनी घसरून ते २,४५६ रुपयांवर बंद झाला.
डेलॉइट गेली सहा वर्षे अदानी पोर्ट्सचे ऑडिटर होते पण शनिवारी त्यांनी राजीनामा दिला. अदानी पोर्ट्सने सांगितले की, त्यांनी डेलॉइटचा राजीनामा स्वीकारला आहे आणि नवीन लेखा परीक्षक म्हणून एमएसकेए आणि असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटंट्सची नियुक्ती केली आहे. सोमवारी अदानी पोर्ट्सचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांनी घसरून ७८७ टक्क्यांवर बंद झाले. अंबुजा सिमेंटचा समभाग ३.४ टक्क्यांनी घसरून ४४१ रुपयांवर बंद झाला, तर अदानी ट्रान्समिशन २.८ टक्क्यांनी घसरला.
दरम्यान, बाजार नियामक सेबीने हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांची चौकशी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १५ दिवसांची मुदत मागितली आहे. न्यायालयाने सेबीला १४ ऑगस्टपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यूएस-आधारित शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाचा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये अदानी ग्रुपवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र यामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.