Join us

आमच्याबद्दल फेक न्यूज पसरवणे थांबवा; अदानी समूहाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 4:14 PM

Adani Group On Fake News : अदानी समूहाने या फेक न्यूजचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Adani Group Warns On Fake News : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) भारतासह विविध देशांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. त्यांनी आफ्रिकन देश केनियामध्येही आपला व्यवसाय सुरू केला आहे. पण, तत्पुर्वी केनियामध्ये त्यांच्या व्यवसायाविरोधात फेक न्यूज चालवल्या जात आहेत. आता अदानी समूहाने केनियामध्ये समूहाबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

अदानी समूहाने 16 सप्टेंबर 2024 रोजी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले की, समूहाने किंवा कोणत्याही उपकंपनीने केनियाशी संबंधित बाबींबाबत कोणतीही प्रेस रिलीज जारी केलेली नाही. काही लोक जाणूबुजून केनियामध्ये समूहाच्या उपस्थितीबद्दल 'अदानी समूह बिनबुडाच्या आरोपांचा आणि धमक्यांचा निषेध करतो' या मथळ्यासह अनेक बनावट बातम्या प्रसारित करत आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अदानी समूह किंवा त्याच्या कोणत्याही उपकंपनीने केनियाबाबत कोणतेही प्रेस रिलीज जारी केलेले नाही.

अदानी समूहाच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, आम्ही या फसव्या कृत्याचा तीव्र निषेध करतो आणि प्रत्येकाने या बनावट फसव्या बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याची विनंती करतो. या निवेदनात कंपनीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. अदानी ग्रुपने मीडियाला विनंती केली की, अदानी ग्रुपवर कोणताही लेख किंवा बातमी प्रकाशित करण्यापूर्वी वस्तुस्थिती आणि स्त्रोतांची पडताळणी करावी.

 

टॅग्स :गौतम अदानीअदानीकेनिया