Join us  

आमची बदनामी करण्याचा प्रयत्न; हिंडेनबर्गने केलेल्या नव्या आरोपांवर अदानी ग्रुपचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 2:04 PM

SEBI प्रमुखांसोबत कुठलेही आर्थिक संबंध नसल्याचे अदानी ग्रुपने म्हटले आहे.

Adani Group On Hindenburg Report : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप करणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने आता थेट मार्केट रेग्युलेटरीवर सेबी (SEBI) वर खळबळजनक आरोप केला आहे. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बुच (Madhabi Puri Buch) अदानींच्या घोटाळ्यात सामील असल्याचा दवा हिंडेनबर्गकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच गेल्या 18 महिन्यांपासून अदानी ग्रुपवर कुठलीही कारवाई झाली नाही, असेही हिंडेनबर्गने म्हटले आहे. दरम्यान, आता या आरोपांवर अदानी समूहाने स्पष्टीकरण दिले असून, सेबी प्रमुखांसोबत आमचे कुठलेही आर्थिक संबंध नसल्याचे म्हटले आहे.

काय आहेत हिंडेनबर्गचे आरोप?अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. काही गुप्त कागदपत्रांचा हवाला देत हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले की, अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती. माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी 5 जून 2015 रोजी सिंगापूरमध्ये IPE प्लस फंड 1 मध्ये त्यांचे खाते उघडले होते. यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक 10 मिलियन डॉलर्स एवढी होती. हा ऑफशोअर मॉरिशस फंड अदानी ग्रुपच्या संचालकाने इंडिया इन्फोलाईनच्या माध्यमातून स्थापन केला होता. हा फंड टॅक्स हेवन असलेल्या मॉरिशसमध्ये रजिस्टर आहे, असे आपल्याला सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दिसत असल्याचा दावा हिंडनबर्गने केला आहे. 

अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळलेहिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या अहवालाबाबत अदानी समूहाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप चुकीचे असून वस्तुस्थितीशी छेडछाड करुन मांडण्यात आल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. शिवाय, आम्ही हिंडेनबर्गने आमच्यावर केलेले हे सर्व आरोप पूर्णपणे नाकारतो, हे आरोप फक्त आमची बदनामी करण्यासाठी लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी केलेल्या या सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यात आली असून, ते पूर्णपणे निराधार असल्याचे सिद्ध झाल्याचेही अदानी ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

माधवी पुरी यांचे स्पष्टीकरणदरम्यान, शनिवारी प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्ग रिपोर्टबाबत सेबी प्रमुख माधबी पुरी-बुच यांनी रविवारी सकाळी स्पष्टीकरण देणारे निवेदन जारी केले. आपल्या निवेदनात त्यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :गौतम अदानीअदानीसेबीव्यवसायगुंतवणूक