अदानी समूहाने (Adani Group) मार्च तिमाहीत सुमारे ३ अब्ज डॉलर्सच्या (जवळपास २१ हजार कोटी) कर्जाची परतफेड केली आहे. या प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या दोन जणांच्या म्हणण्यानुसार, समूहानं तारण ठेवलेले शेअर्स सोडवण्यासोबतच ३ देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्यांचे पैसेही फेडले आहेत. यापूर्वी अदानी समूहानं एवढ्या मोठ्या रकमेच्या कर्जाची परतफेड कोणत्याही तिमाहीत केलेली नव्हती.
“जी क्यूजी पार्टनर्सचे १.८८ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक आणि प्रमोटर ग्रुपते १ बिलियन डॉलर्सच्या फंडिंगचा उपयोग या कर्जाची परतफेड करण्यासाठी करण्यात आला आहे,” अशी माहिती या प्रकरणावर लक्ष ठेवणाऱ्या एका व्यक्तीनं दिली. नियामकाला दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहानं समूहाच्या ४ कंपन्यांचे (अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन) तारण ठेवलेले शेअर्स सोडवण्यासाठी २.५४ अब्ज डॉलर्सची रक्कम फेडली आहे.
कोणत्या कंपनीचे किती शेअर्स?
मार्च तिमाहीच्या अखेरीस, अदानी एंटरप्रायझेसचे तारण ठेवलेले शेअर्स ०.४४ टक्क्यांवर आले. जे यापूर्वी १.९४ टक्के होते. अदानी पोर्ट्सचे तारण शेअर्स ११.२८ टक्क्यांवरून २.८४ टक्क्यांवर, अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स ४.९२ टक्क्यांवरून २.६९ टक्क्यांवर आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स २.६५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आले आहेत.
कोणत्या भारतीय कंपन्यांचे पैसे फेडले?
कंपनीच्या अंतर्गत नोट्सनुसार, अदानी समूहानं एसबीआय म्युच्युअल फंड्सना विकलेल्या ३६५० कोटी रूपयांचे कमर्शिअल पेपर्स, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाला ५०० कोटी, एचडीएफसी म्युच्युअल फंडाला ४५० कोटी रुपये दिले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.