Gautam Adani : काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह ८ जणांवर २२०० कोटींहून अधिक रुपयांची लाचखोरीचा आरोप केला होता. मात्र, आता तीच अमेरिका गौतम अदानी यांच्यासाठी पायघड्या घालत आहे. कारण, ट्रम्प यांनी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट १९७७ वर बंदी घातल्याने अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर आता अदानी समूह अमेरिकेत मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, अदानी समूह अणुऊर्जा, यूटिलिटीज आणि पूर्व किनाऱ्यावर असलेले बंदर यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.
अदानी समूह अमेरिकेत गुंतवणूक करण्यास उत्सुक
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर गौतम अदानी यांनी अमेरिकेत १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा शब्द दिला होता. या गुंतवणुकीतून १५००० नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर लगेचच अदानीसह ८ जणांवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला, त्यामुळे गुंतवणुकीची चर्चा पुढे सरकू शकली नाही. पण, ट्रम्प सत्तेत आल्यानंतर सर्व समीकरणे बदलली. अदानी यांच्यावर ज्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्या कायदावर ट्रम्प सरकराने बंदी घातली. त्यामुळे अदानी समूह पुन्हा एकदा गुंतवणूक करण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी अदानी समूह टेक्सासमध्ये पेट्रोकेमिकल्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होता. याशिवाय अनेक अमेरिकन कंपन्यांशी संभाव्य सहकार्याबाबतही चर्चा सुरू होती.
अदानी समूहावर नेमके काय आरोप होते?
गौतम अदानी यांच्यासह त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत एस जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाने सांगितले की गौतम अदानी यांनी भारतात सौरऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे २२०० कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप होता. लाचेचे पैसे गोळा करण्यासाठी या लोकांनी अमेरिकन गुंतवणूकदारांना तसेच बँकेची फसवणूक केली. हे प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि इतर कंपन्यांशी संबंधित होते. या कंपन्यांमध्ये अमेरिकन गुंतवणूकदारांचे पैसे होते. अमेरिकन गुंतवणुकदारांच्या पैशाने लाच देणे हा गुन्हा आहे असे अमेरिकन कायदा सांगतो, त्यामुळे अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अदानी समूहाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.