Gautam Adani Group : अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मात्र, मध्यंतरी एका वृत्तपत्रातील बातमीनं या समूहावर फसवणुकीचा आरोप करत खळबळ उडवून दिली. २०१३ मध्ये अदानी समूहानं कमी दर्जाचा कोळसा उच्च किमतीचं इंधन म्हणून विकून फसवणूक केल्याची शक्यता लंडनस्थित फायनान्शिअल टाईम्सनं व्यक्त केली होती. आता या प्रकरणी अदानी समूहाकडून निवेदन जारी करून स्पष्टीकरण देण्यात आलंय. तसंच हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
रिपोर्टमध्ये फसवणुकीचा आरोप
'२०१३ मध्ये अत्यंत कमी दर्जाचा कोळसा उच्च दर्जाचा कोळसा असल्याचं सांगून अदानी समूहाकडून फसवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे जानेवारी २०१४ मध्ये अदानी समूहानं इंडोनेशियाच्या एका कंपनीकडून २८ डॉलर प्रति टन दराने 'लो ग्रेड' कोळसा खरेदी केला. तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कंपनीला (TANGEDCO) उच्च प्रतीच्या कोळशाच्या स्वरूपात सरासरी ९१.९१ डॉलर प्रति मेट्रिक टन दराने विक्री करण्यात आली,' असं अदानी समूहाबाबत आर्गनाइज्ड क्राइम एंड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टच्या (OCCRP) डॉक्युमेंट्सचा हवाला देत सांगण्यात आलं होतं.
काय म्हटलं अदानी समूहानं?
अदानी समूहानं या आरोपांवर स्पष्टीकरण देणारं एक निवेदन जारी केलंय. तसंच हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचं समूहाच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. अदानी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडनं टेंजेडकोला निविदा आणि पीओमध्ये नमूद केलेल्या गुणवत्तेच्या मानकांच्या तुलनेत निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. कोळसा पुरवठा करणाऱ्या एजन्सींनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता तपासणी केली असून निकृष्ट दर्जाच्या कोळशाच्या पुरवठ्याचा आरोप केवळ निराधार आणि खोटा असल्याचं यावरून स्पष्ट होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय.