Join us

अदानी समूहाने शेअर्स गहाण ठेवून घेतलेले कर्ज फेडले; २.१५ अब्ज डॉलर्सची परतफेड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:40 PM

अदानी समूहाच्या दोन कंपन्यांवरील कर्जाबाबत रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सने चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई : अदानी समूहाने शेअर्स गहाण ठेवून घेतलेल्या २.१५ अब्ज डॉलर्स कर्जाची परतफेड केल्याचा दावा केला आहे. आता केवळ ऑपरेटिंग कंपनी स्तरावर घेतलेले कर्ज थकीत आहे. २.१५ अब्ज डॉलर्स कर्जाची परतफेड न केल्याचे वृत्त 'निराधार' म्हणत फेटाळून लावले आहे. अदानी ग्रीन, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स तारण ठेवण्यात आले होते.

दरम्यान, अदानी समूहाच्या दोन कंपन्यांवरील कर्जाबाबत रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सने चिंता व्यक्त केली आहे. फिचनुसार, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्ट्सवरील कर्ज अतिशय मोठी जोखीम असलेले आहे. जर त्याला योग्य प्रकारे हाताळले नाही तर मोठा आर्थिक फटका बसू शकतो. केवळ दोन कंपन्यांनाच नव्हे तर इतरांनाही याचा फटका बसू शकतो, असे फिचने म्हटले आहे. फिचच्या या अहवालात दोन्ही कंपन्यांना बीबीबी रेटिंग देण्यात आले आहे. फिचच्या या रेटिंगचा अदानींच्या समभागांवर बुधवारी खूप मोठा परिणाम झाला नाही. अदानी ट्रान्समिशनमध्ये एक टक्का घसरण झाली तर अदानी पोर्ट्समध्ये ७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

सीमा शुल्क विभागाचे अपील फेटाळले

आयात केलेल्या उत्पादनांचे अधिक मूल्यांकन केल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने अदानी समूहाच्या दोन कंपन्यांविरुद्ध दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, त्यामुळे अपील फेटाळण्यात येत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

बाजारात तेजी

जागतिक बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे बुधवारी बाजारात तेजी आली होती.

टॅग्स :अदानीव्यवसायशेअर बाजार