Join us  

अदानी ग्रूपचा आज दुबईत रोड शो, तर अमेरिकेत पुढच्या आठवड्यात; यामागचं कारण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 2:55 PM

अदानी ग्रूप सध्या हिंडेनबर्गच्या अहवालामुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.

नवी दिल्ली-

अदानी ग्रूप सध्या हिंडेनबर्गच्या अहवालामुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकन ब्युटीक इन्व्हेस्टमेंट फर्म जीक्यूजी पार्टनर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर अदानी ग्रूपच्या शेअर्सनं पुन्हा एकदा तेजी अनुभवली आहे. आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये रोड शो आयोजित करण्याचं अदानी ग्रूपनं ठरवलं आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं गुंतवणूकदारांना पटवून देण्यासाठी अदानी ग्रूप प्रयत्नशील आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं सिंगापूरमध्ये फिक्स्ड-इन्कम-रोडशो आयोजित केला होता. जो अत्यंत यशस्वी ठरला. यानंतर कंपनीनं हीच मालिका पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

न्यूझ एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार अदानी ग्रूप या महिन्यात लंडन, दुबई आणि अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये रोड शो आयोजित करणार आहे. याचं आयोजिन ७ मार्च ते १५ मार्चमध्ये होणार आहे. यात अदानी ग्रूपचे मुख्य अर्थ अधिकारी जुगशिंदर सिंग यांच्यासह ग्रूपचे व्यवस्थापकीय मंडळ सहभागी होणार आहे. दुबईत आज अदानी ग्रूपचा रोड शो होणार आहे. तर लंडनमध्ये ८ मार्च आणि ९ ते १५ मार्च या कालावधीत अमेरिकेतील शहरांमध्ये रोड शो होणार आहे. 

सिंगापूर आणि हाँगकाँगमधील रोड शो यशस्वीजुगशिंदर सिंग यांच्यासह अदानी समूहाचे व्यवस्थापकांनी गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी गेल्या महिन्यात सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रोड शो केला होता. कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांना सांगितलं होतं की आगामी लोन मॅच्युरिटीबाबत माहिती देतील. अदानी समूहाचं एकूण कर्ज २०१९ मध्ये १.११ लाख कोटी रुपये इतकं होतं. पण २०२३ मध्ये ते वाढून २.२१ लाख कोटी रुपये इतकं झालं होतं. कंपनीकडील रोख वगळता २०२३ मध्ये नेट कर्ज १.८९ लाख कोटी रुपये इतकं होतं. 

रोड शो म्हणजे काय?रोड शोच्या माध्यमातून कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कंपनीची आर्थिक परिस्थिती स्थिर असून तुम्ही कंपनीत गुंतवणूक करू शकता याची ग्वाही या रोड शोच्या माध्यमातून दिली जाते. अदानी ग्रूप या रोड शोच्या माध्यमातून हिंडेनबर्ग अहवालातील आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करता येईल. 

टॅग्स :गौतम अदानी